महाराष्ट्रमुंबई

मुंबई, ठाण्यातील पावसाच्या परिस्थितीचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आढावा

मुंबई: मागील तीन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईसह ठाणे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मंगळवारी मुंबई आणि ठाणे शहरातील विविध भागांची पाहणी केली. मुंबईतील मिठी नदीची आणि नदी काठच्या परिसराचा आढावा घेतला तसेच विक्रोळी पार्कसाईट येथील दरडप्रवण परिसराची उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पाहणी केली. यावेळी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाला त्यांनी दिले. या पाहणी दौऱ्यात आमदार दिलीप लांडे उपस्थित होते.

ठाण्यातील नौपाडा तसेच कोपरीमधील चिखलवाडी येथे पाणी साचले आहे. हा परिसर सखल भाग असल्याने तिथे जरा पाऊस झाला की पाणी भरते. पंप लावून तेथील पाण्याचा निचरा करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांना दिले. उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, ठाण्यात २२५ मिलीमीटर इतका पाऊस पडला आहे. त्यामुळे सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. पाण्याचा निचरा करण्यासाठी महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत.आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे काम सुरु असून पावसाच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

वांद्रे येथील मिठी नदीचा आणि नदी काठच्या परिसराचा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी भेट देऊन आढावा घेतला. दोन दिवसांपूर्वी विक्रोळी पार्कसाईट येथे वर्षा नगर या डोंगराळ वस्तीवर दरड कोसळली होती. या दरडप्रवण परिसराची आज उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पाहणी केली. मुंबईतील पावसाच्या परिस्थितीबाबत सकाळी मुंबई महापालिका आयुक्तांशी देखील फोनवर चर्चा झाली आहे. मिठी नदी काठच्या परिसरात ‘एनडीआरएफ’ची पथके, बोटी तैनात आहेत. राज्य सरकार आणि पालिका प्रशासन परिस्थिती हातळण्यासाठी सज्ज असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. मुसळधार पाऊस सुरु असून नागरिकांनी काळजी घ्यावी. आवश्यकता असेल तरच बाहेर पडावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!