महाराष्ट्रमुंबई

राज ठाकरे आणि फडणवीस टायमिंग साधण्यात माहिर – उदय सामंत

 मुंबई: राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही टायमिंग साधण्यात माहिर आहेत. या भेटीत काय चर्चा झाली, हे तेच सांगू शकतील. राज ठाकरे महायुतीत यावेत, अशी आमची इच्छा आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना (शिंदे गट)  उदय सामंत यांनी दिली आहे.बेस्ट एम्प्लॉईज को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीत उबाठा आणि मनसेच्या संयुक्त उत्कर्ष पॅनेलचा धुव्वा उडाला. त्या पार्श्वभूमीवर आज मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. वर्षा निवासस्थानी झालेल्या या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. या भेटीमुळे आता राजकीय तर्क-वितर्क लढवले जात आहेत. यावर विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटायला अनेकजण जात असतात. काही महत्त्वाचे प्रश्न असतात, त्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटायला जाणे, ही आपली परंपरा आहे. त्यातून वेगळा अर्थ काढण्याचे काहीच कारण नाही.
तर, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हटले आहे की, विरोधी पक्षाचे नेते भेटायला गेले असतील तर जाऊ द्या. राज ठाकरे फडणवीस यांना अनेकदा भेटले आहेत. कदाचित ते गणपतीचे आमंत्रण द्यायला गेले असतील किंवा राज्यातील प्रश्नांवर चर्चा करत असतील. माध्यमांनाच या भेटीची चिंता लागली आहे. राज्यातले दोन प्रमुख नेते भेटत आहेत. त्यांच्यात बंद दाराआड चर्चा होत असेल तर त्यांनीच भेट घेण्याचे कारण सांगितले पाहिजे. राज ठाकरे यांचा स्वभाव पाहता, ते स्वतःच याबद्दल परखडपणे आणि स्पष्ट बोलतील. मुख्यमंत्र्यांना भेटणे हा राजकीय अपराध होत नाही. माझे किंवा उद्धव ठाकरेंचे काही सामाजिक काम असेल तर आम्हीही मुख्यमंत्र्यांना भेटू शकतो. राज्याचा मुख्यमंत्री एका गटाचा किंवा पक्षाचा नसतो. ते ११ कोटी जनतेचे प्रतिनिधी आहेत. राज्यासंदर्भातील काही प्रश्न मांडायला गेले असतील. फडणवीस यांच्या राज्यात दोन दिवसांपासून मुंबई बुडत आहे. नाशिक, ठाणे सारखी शहरे बुडाली. त्यामुळे राज्याच्या प्रश्नांवर राज ठाकरेंनी काही चर्चा केली असेल. आम्हाला या बद्दल त्रास होत नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!