महापालिका शाळांचे खाजगीकरण म्हणजे मुलांच्या भविष्यास धोका; काँग्रेसचा इशारा

मुंबई : मालवणी येथील टाऊनशिप महापालिका शाळा साहस फाउंडेशन या खाजगी संस्थेकडे सोपविण्याच्या निर्णयामुळे शनिवारी मोठा गोंधळ उडाला. शाळा खाजगी संस्थेकडे देण्याच्या विरोधात काँग्रेसने पालकांसह रस्त्यावर उतरून जोरदार आंदोलन छेडले. या वेळी वातावरण तणावपूर्ण बनले असून पोलिसांनी हस्तक्षेप करून आमदार असलम शेख, माजी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्जही करण्यात आला.
आंदोलनादरम्यान काँग्रेस आमदार असलम शेख यांनी ठाम भूमिका मांडली. त्यांनी म्हटले –
“महापालिका शाळांचे खाजगीकरण म्हणजे मुलांच्या भविष्यास थेट धोका आहे. काँग्रेस हा निर्णय कोणत्याही परिस्थितीत अमलात आणू देणार नाही. सरकारने तातडीने हा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा रस्त्यापासून विधानसभेपर्यंत तीव्र आंदोलन छेडले जाईल. मुलांच्या शिक्षणावर सौदेबाजी कधीही सहन केली जाणार नाही.”
मुंबई काँग्रेस अध्यक्षा आणि माजी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनीही यावेळी सरकारवर जोरदार टीका केली. त्यांनी सांगितले –
“शिक्षण हा प्रत्येक मुलाचा हक्क आहे. तो ठेकेदार व खाजगी संस्थांच्या हवाली करणे म्हणजे गरीब मुलांचा हक्क हिरावून घेणे होय. काँग्रेस या अन्यायाविरोधात सर्व स्तरावर लढा देईल.”
काही दिवसांपूर्वीच पालक व शिक्षकांच्या झालेल्या बैठकीत असलम शेख यांनी सदर शाळा साहस फाउंडेशनकडे सोपविण्यास तीव्र विरोध दर्शविला होता. त्यानंतर शनिवारी सकाळी शेकडो पालक, विद्यार्थी आणि काँग्रेस कार्यकर्ते शाळेबाहेर जमले. घोषणाबाजी करत सरकारविरोधात संताप व्यक्त करण्यात आला.
या वेळी पालकांनी मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र, आंदोलनकर्त्यांवर झालेल्या लाठीचार्जमुळे संताप अधिकच भडकला.
पालकांचा आरोप होता की, “मंगल प्रभात लोढा आमचेही मंत्री आहेत. मात्र त्यांनी पालक व विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींशी संवाद साधण्याऐवजी खाजगी संस्थांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. यावरून सरकार खाजगी संस्थांच्या बाजूने उभे आहे, हे स्पष्ट झाले आहे.”
काँग्रेस नेत्यांनी स्पष्ट केले की महापालिका कोट्यवधी रुपये खर्चून शाळा उभारते. अशा शाळा खाजगी संस्थांना देणे म्हणजे गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाला धक्का देणारा निर्णय आहे. महापालिकेच्या शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी प्रामुख्याने झोपडपट्टी व कामगार वर्गातील आहेत. त्यामुळे खाजगीकरणामुळे या विद्यार्थ्यांना शाळाबाहेर ढकलले जाण्याचा धोका आहे, असे काँग्रेसचे म्हणणे आहे.
पक्षाने स्पष्ट इशारा दिला आहे की महापालिका शाळांचे खाजगीकरण रोखण्यासाठी आता लढा आणखी तीव्र केला जाणार आहे. “शिक्षण विकले जाणार नाही; काँग्रेस कुठल्याही किंमतीवर हा अन्याय होऊ देणार नाही,” असा पवित्रा काँग्रेसने घेतला आहे.