सातासमुद्रापार सादर होणार महिलांचे नमन – उदय सामंत

कोकण: कलाकारांनी भजन, जाकडी, नमनाने कोकणची संस्कृती टिकवली आहे. तरुणांनी उच्च शिक्षण घेतले तरी त्यांना नमनात काम करण्याची लाज वाटू नये. मला दोन – चार महिने संधी मिळाली तर मी सुद्धा नमनात काम करेन. रत्नागिरीच्या राजा मंडळातर्फे महिला भगिनींचे नमन आयोजित करू. तसेच या भगिनींची नमन कला सातासमुद्रापार नेण्यासाठी सर्व खर्चाची जबाबदारी मी घेतो, असे आश्वासन राज्याचे उद्योगमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिले.
आभार सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाचा रत्नभूषण पुरस्कार सामंत यांना प्रदान करण्यात आला. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना सामंत बोलत होते. स्वयंवर मंगल कार्यालयात कार्यक्रम झाला. सामंत म्हणाले की, रत्नभूषण पुरस्काराने मला राजकीय जीवनात काम करण्याची उर्जा दुप्पटीने वाढली आहे. महायुती सरकारने नोंदणीकृत भजन मंडळाला २५ हजार रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. स्थानिक कलावंतांना मानधन देण्याच्या कमिटीवर खेडशीचे नमन साता समुद्रापार नेणारे भिकाजी गावडे यांना अध्यक्ष केले आहे. त्यामुळे कलाकारांना न्याय मिळतोय.
कार्यक्रमाचे अध्यक्ष चिपळूणच्या टिळक स्मारक ग्रंथालयाचे कार्याध्यक्ष डॉ. अरुण इंगवले यांनी डॉ. सामंत यांना पुरस्कार प्रदानकेला. याप्रसंगी अण्णा सामंत, आभार संस्थेचे अध्यक्ष विनोद हळदवणेकर, सल्लागार डॉ. दिलीप पाखरे, साईनाथ नागवेकर, प्रेरणा विलणकर, यशवंत वाकडे, वासुदेव वाघे, शरद गोळपकर, आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सागर मायंगडे, प्रवीण सावंतदेसाई, दादा वाडेकर, राकेश बेर्डे, लक्ष्मीकांत हरयाणबुवा आदींनी मेहनत घेतली.