महाराष्ट्रमुंबई

पेणकरांचा विजय! खासदार धैर्यशील पाटील यांच्या प्रयत्नांना यश ; दिवा–सावंतवाडी एक्सप्रेसला पुन्हा मिळाला पेण थांबा

पेण: रायगड जिल्ह्यातील प्रवाशांची दीर्घकाळापासूनची प्रतीक्षा अखेर संपुष्टात आली आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री  अश्विनी वैष्णव यांनी दिवा–सावंतवाडी एक्सप्रेसला पुन्हा पेण येथे थांबा देण्यास मान्यता दिली असून हा निर्णय पेण व रायगडकरांसाठी ऐतिहासिक ठरला आहे.

२०१६ पर्यंत या गाडीचा पेण येथे थांबा होता. मात्र त्यानंतर अचानक तो थांबा काढण्यात आल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. पेण तालुका हे रायगड जिल्ह्यातील महत्त्वाचे केंद्र असून येथून मुंबई व कोकणदरम्यान प्रवास करणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. त्यामुळे या थांब्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून वारंवार होत होती.

खासदार धैर्यशील पाटील यांनी या प्रश्नावर सातत्याने संसदेत वेळोवेळी ही मागणी उचलून धरली होती व पाठपुरावा करून रेल्वेमंत्र्यांना पत्राद्वारे सविस्तर माहिती दिली होती. या मागणीला अखेर सकारात्मक प्रतिसाद देत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या मंत्रालयाने मान्यता दिली आहे.

प्रवासी संघटनांचा आनंद

पेण रेल्वे प्रवासी संघटनेचे पदाधिकारी यांनी सांगितले की, “पेण तालुक्यातील हजारो प्रवासी दररोज मुंबई–कोकणदरम्यान प्रवास करतात. एक्सप्रेस गाडीचा थांबा नसल्यामुळे प्रवाशांना दिवा, पनवेल किंवा रोहा येथे जावे लागत होते. आता थांबा मिळाल्याने वेळ आणि खर्च दोन्ही वाचणार आहेत.”

स्थानिक व्यापारी संघटनेच्या प्रतिनिधींनीही या निर्णयाचे स्वागत केले आहे. “पेण शहर हे व्यापारी दृष्ट्या देखील महत्त्वाचे असून रेल्वे थांबा मिळाल्याने व्यवसायालाही चालना मिळेल,” असे मत व्यक्त करण्यात आले.

नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पेण शहरात ही बातमी समजताच नागरिकांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले. “हा खरा पेणकरांचा विजय आहे. खासदार धैर्यशील पाटील यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळेच हा थांबा पुन्हा मिळाला,” असे मत अनेकांनी व्यक्त केले.

प्रवासाला गती

या निर्णयामुळे आता पेण परिसरातील प्रवाशांना मुंबई–कोकण प्रवासासाठी थेट सुविधा उपलब्ध होणार असून दैनंदिन प्रवास व लांब पल्ल्याचा प्रवास अधिक सुलभ व सोयीस्कर होणार आहे.
या गाडीला पेण येथे थांबा मिळाल्यामुळे राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील यांचे रेल्वे प्रवासी संघटना व प्रवाशांकडून कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!