डॉक्टर-रुग्ण नातं : व्यवहार की सेवा?

भारत : वैद्यकीय क्षेत्राला १९९५ मध्ये एक अतूट झटका बसला. सर्वोच्च न्यायालयाने इंडियन मेडिकल असोसिएशन विरुद्ध व्ही.पी. शांथा या प्रकरणात दिलेल्या निर्णयाने वैद्यकीय सेवांना ग्राहक संरक्षण कायद्याखाली आणले. या एकाच निर्णयाने डॉक्टर आणि रुग्ण या जुन्या, पवित्र मानल्या जाणाऱ्या नात्याचेच स्वरूप बदलून टाकले आता तो ग्राहक झाला आहे. आज, जवळपास तीन दशकांनंतर, आपण या निर्णयाची फळे चाखत आहोत – काही गोड तर काही कडू.
या निर्णयाचे सर्वात मोठे सकारात्मक परिणाम म्हणजे तो रुग्णांच्या बाजूने उभा राहिला. याआधी वैद्यकीय दुर्लक्ष झाल्यास सामान्य माणसासाठी महागड्या आणि वर्षांवर्षे चालणाऱ्या न्यायालयीन प्रक्रियेस तोंड देणे अशक्यप्राय होते. ग्राहक न्याय मंचामार्फत न्याय मिळवणे स्वस्त, वेगवान आणि तुलनेने सोपे झाले. डॉक्टर आणि रुग्णालयांवर कायदेशीर जबाबदारीचा दबाव वाढल्यामुळे सेवेच्या गुणवत्तेत सुधारणा झाली. डॉक्टरांनी आता रुग्णाला त्याच्या आजाराबद्दल, शक्य उपचारपद्धती आणि संभाव्य गुंतागुंतांबद्दल स्पष्टपणे सांगणे आवश्यक झाले.
या पार्श्वभूमीवर वैद्यकीय रेकॉर्ड ठेवणे, प्रक्रिया नोंदवणे, संमतीपत्र व्यवस्थित घेणे यासारख्या गोष्टी शिस्तबद्ध पद्धतीने पाळल्या जाऊ लागल्या. हा एक सकारात्मक बदल म्हणता येईल, ज्यामुळे पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढले.
मात्र, या निर्णयाने डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील परंपरागत नात्याला एक व्यवहारवादी रूप आले गेले. पूर्वीचे नाते विश्वास, सहानुभूती आणि माणुसकीवर आधारलेले होते. आता ते नाते कायदेशीर कराराच्या जवळजवळ आले आहे. डॉक्टर रुग्णाला एक कंज्यूमर, ‘क्लायंट’ किंवा ‘कायदेशीर दाव्याची शक्यता’ म्हणून पाहू लागले, तर रुग्ण डॉक्टरकडे फक्त सेवा पुरवणारा म्हणून पाहू लागला. ही ‘दुकानदार-ग्राहक’ मानसिकता नात्याच्या मूळ आत्म्यालाच धक्का देणारी ठरली आहे.
कायदेशीर कारवाईच्या भीतीमुळे डॉक्टरांमध्ये ‘संरक्षणात्मक वैद्यकशास्त्र’ (Defensive Medicine) ची प्रवृत्ती वाढली आहे. चुकीच्या आरोपासाठी जबाबदार धरण्याच्या भीतीने डॉक्टर अनावश्यक चाचण्या, स्कॅनिंग आणि तपासण्या करण्यास प्रवृत्त होतात. यामुळे रुग्णांचा उपचारावरील खर्च प्रचंड वाढतो. साहजिकच डॉक्टर आपल्याला लुबाडत नाहीत ना असे वाटायला लागते. उदाहरणार्थ, भारतीय वैद्यकीय संघटनांच्या अहवालांनुसार काही महानगरांमध्ये साध्या डोकेदुखीसाठीही एमआरआय किंवा सीटी स्कॅन करण्याचे प्रमाण ३० टक्क्यांनी वाढले आहे.
प्रत्येक चुकीसाठी कायदेशीर आणि सामाजिक जबाबदारीचा ताण, रुग्णांच्या कुटुंबियांकडून होणारी हिंसक प्रतिक्रिया आणि माध्यमांद्वारे होणारी बदनामी यामुळे अनेक डॉक्टर मानसिक तणावाखाली आले आहेत. २०१९ मधील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सर्वेक्षणानुसार भारतातील जवळपास ७५% डॉक्टरांनी रुग्णांकडून झालेल्या शारीरिक किंवा तोंडी हल्ल्याचा अनुभव सांगितला आहे. हे प्रमाण नात्यातील विश्वासाचा किती मोठा ऱ्हास झाला आहे, याचे निदर्शक आहे.
आजच्या काळात या नात्यात आणखीन गुंतागुंत आली आहे. मेडिकल इन्शुरन्सच्या युगात, डॉक्टर-रुग्ण या द्विपक्षीय नात्यात विमा कंपनी हा तिसरा एक प्रभावी पक्ष ठरू लागला आहे. विम्याने मंजूर केलेल्या चाचण्या आणि उपचारपद्धतींपुरते मर्यादित राहण्याचा दबाव डॉक्टरांवर येतो. परिणामी, काही वेळा डॉक्टरांच्या वैद्यकीय निर्णयक्षमतेवर विमा कंपन्यांचे आर्थिक बंधन हावी होते.
इंटरनेटमुळे आज रुग्ण स्वतःचे निदान करून डॉक्टरकडे येतात. यामुळे डॉक्टरच्या तज्ञत्वावर प्रश्नचिन्ह उभे राहते. दुसरीकडे, इलेक्ट्रॉनिक मेडिकल रेकॉर्ड्समुळे पारदर्शकता वाढली आहे. पण दुर्दैवाने, कायदेशीर प्रक्रिये ऐवजी हिंसक मार्गाचा अवलंब करणाऱ्या काही रुग्ण नातलगांमुळे हे नाते आणखीन धोक्यात आले आहे.
१९९५ चा निर्णय हा एक दुधारी तलवार सिद्ध झाला आहे. रुग्णांना सक्षम करणे आवश्यक होते, पण त्याचवेळी वैद्यकीय निष्णाततेचा आदर करणे आणि डॉक्टरांना सुरक्षित, सहकार्यात्मक वातावरण उपलब्ध करून देणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.
आवश्यकता आहे एका समतोलाची. वैद्यकीय तक्रारींसाठी स्वतंत्र, जलद आणि तज्ञ न्याययंत्रणा उभी करणे आवश्यक आहे. इंग्लंड मधील NHS Complaints Ombudsman प्रमाणे स्वतंत्र वैद्यकीय तक्रार निवारण प्रणाली भारतात उभारली जाऊ शकते. त्याचबरोबर रुग्ण जागरूकता वाढवणे, डॉक्टरांसाठी कायदेशीर जोखीम व्यवस्थापनाचे प्रशिक्षण, आणि संवाद कौशल्यावर भर देणेही आवश्यक आहे.
हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे की हे जरी विज्ञान असले तरी त्यामध्ये अनिश्चितता नेहमीच राहते. डॉक्टर हा देव नाही, पण तो फक्त दुकानदारही नाही. तो एक प्रशिक्षित तज्ञ आहे जो मानवी जीवनाशी निगडित सर्वात नाजूक निर्णय घेतो. आणि रुग्ण हा केवळ ग्राहक नसून, अशी व्यक्ती आहे जी आपल्या सर्वात असुरक्षित क्षणी डॉक्टरवर विश्वास ठेवते.
उपचार केवळ औषधोपचारापुरते मर्यादित नसतात. रुग्णाला “मनासारखा बरा” होण्यासाठी डॉक्टर-रुग्ण यांच्यातील विश्वास हा सर्वोत्तम औषध ठरतो. म्हणूनच या नात्यातील विश्वास पुन्हा जपणे हेच आजच्या आरोग्य व्यवस्थेचे सर्वात मोठे आव्हान आहे.