मुंबई – गोवा महामार्गावर 8 सप्टेंबरपासून अवजड वाहतूक होणार पूर्ववत

मुंबई : गणेशोत्सव कालावधीत महामार्गावर अवजड वाहनामुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी २३ ऑगस्टपासून अवजड वाहतुकीला ब्रेक लागला. ८ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजल्यापासून अवजड वाहनांची वाहतूक पूर्ववत होणार आहे. रखडलेल्या चौपदरीकरणासह महामार्गावरून धावणाऱ्या अवजड वाहनांमुळे गणेशोत्सवादरम्यान वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होतो. अवजड वाहनांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीतून गणेशभक्तांची वाहने मार्गस्थ करताना महामार्गावर तैनात पोलीस यंत्रणेची दमछाक होते. या पार्श्वभूमीवर २३ ऑगस्टपासून महामार्गावर अवजड वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे. ७ दिवसांच्या गणरायाला निरोप दिल्यानंतर गणेशभक्त परतीला निघाले आहेत. यामुळे महामार्ग वाहनांच्या रेलचेलीने पुरता गजबजला आहे. ६ सप्टेंबर रोजी १२ दिवसांच्या गणरायाला निरोप दिल्यानंतर गणेशोत्सव संपुष्टात येणार आहे. यामुळे रोखण्यात आलेली अवजड वाहतूक ८ सप्टेंबरपासून पूर्ववत होणार आहे.