महाराष्ट्र

पृथ्वीच्या रक्षणासाठी आणि मानवजातीच्या अस्तित्वासाठी बांबू-आधारित शाश्वत विकासाची गरज..

 मुंबई : “पृथ्वी आज अभूतपूर्व पर्यावरणीय संकटांचा सामना करत आहे. जगभरातील जंगलातील आगी व ढगफुटी यामुळे हे वातावरण बदलाचे नैसर्गिक संकट प्रत्यक्षात दिसून येत आहे. अशा परिस्थितीत राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री पर्यावरण शाश्वत विकास टास्क फोर्सचे कार्यकारी अध्यक्ष पाशा पटेल यांनी बांबू हा “कल्पवृक्ष” म्हणून शाश्वत विकासाचा मार्ग सुचवला आहे. बांबूच्या अतिशीघ्र वाढीमुळे कार्बन शोषण, जंगलतोड रोखणे, आणि जैवइंधन निर्मिती शक्य आहे. 18-19 सप्टेंबर 2025 रोजी मुंबईत आंतरराष्ट्रीय बांबू परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ही परिषद या संकटांना तोंड देण्यासाठी नव्या दिशा दाखवेल, या परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासह तज्ञ, शास्त्रज्ञ, आणि शेतकरी सहभागी होणार आहेत.”

पर्यावरणीय संकटाचा वाढता धोका

मनुष्य प्राण्याला पृथ्वीवर सुखा-समाधानाने जगण्यासाठी 33% भूभाग हा वनाच्छादित असला पाहिजे. जी पृथ्वी गेल्या दोन हजार वर्षात ०.५ डिग्री सेल्सिअसने तापली होती. तीच पृथ्वी औद्योगिकरणानंतर गेल्या दीडशे वर्षात 1.5 डिग्री सेल्सिअसने तापली. हे सगळं कशामुळे झाले तर जीवाश्म इंधनामध्ये पेट्रोल, डिझेल किंवा कोळशाचा वारेमाप वापर इंधन म्हणून केला गेला. परिणामी वातावरणातील कार्बन उत्सर्जन वाढले. याच गोष्टींचा अतिरेकी वापर पृथ्वीच्या विनाशाला कारणीभूत ठरत आहे. पृथ्वीतलावर 350 पीपीएम कार्बन उत्सर्जन असेल तर जीव- जंतू व्यवस्थित जगू शकतात. आज याच कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण हे 427 ते 430 पीपीएम पर्यंत पोहोचले आहे. संयुक्त राष्ट्राच्या आयपीसीसी (Intergovernmental Panel on Climate Change) नुसार 450 पीपीएम कार्बन उत्सर्जन झाल्यावर पृथ्वीवर विनाश घडणार आहे. आयपीसीसी च्या अहवालात 2030 मध्ये शंभर दिवसात पडणारा पाऊस हा 52 तासात पडेल असा इशारा देण्यात आला होता.

2030 ला अजूनही पाच वर्षाचा कालावधी आहे. आज पृथ्वीच्या पाठीवर कुठेही नॉर्मल स्वरूपाचा पाऊस पडत नाही. 47 डिग्री सेल्सिअस तापमान झाल्यानंतर माणूस प्राण्याचे मेंदू, हृदय, किडनी आणि इतर अवयव काम करू शकत नाही. आपण पाहिले की 2024 मध्ये दिल्लीचे तापमान हे 52.9 डिग्री सेल्सिअस झाले. त्याच वेळी दुबई चे तापमान हे 64 डिग्री सेल्सिअस पर्यंत पोचले होते. सगळं काही आयपीसीसीच्या अहवालानुसार घडतंय फरक एवढाच की ते त्यांनी दिलेल्या अहवालानुसार आधीच तुमच्या आजूबाजूला घडतंय.

अलीकडेच अमेरिकेमध्ये 24 तासात 11 किलोमीटर लांबीच्या आणि अकरा लाख हेक्टर वरील जंगलाला वणवा लागला. जंगल जळून खाक झाले. सॅन फ्रान्सिसकोमध्ये सेलिब्रिटी राहत असलेल्या भागात दोन लाख घरांची जळून राख झाली. फ्रान्समध्ये हिरव्यागार द्राक्षबागा जळून गेल्या. इस्रायल देशामध्ये इतकी मोठी आग लागली की ती विझवणे हे इस्रायलसारख्या प्रगत देशाला आटोक्याबाहेर गेले. कधी नव्हे ते यंदा युरोपचे तापमान हे 41 डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचले होते. आपल्या देशात उत्तरकाशीमध्ये संपूर्ण एक गाव 30 सेकंदामध्ये वाहून गेले.उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील धाराली गावाजवळील खीरगंगा परिसरात 6 ऑगस्ट 2025 रोजी  ढगफुटीमुळे (cloudburst) अवघ्या काही सेकंदात प्रचंड पाणी आणि मलबा खीरगंगा नदीतून गावाकडे आला, ज्यामुळे धाराली गावाचा मोठा भाग उद्ध्वस्त झाला. या आपत्तीत 50 हून अधिक घरे नष्ट झाली, 4 जणांचा मृत्यू झाला, आणि 50 हून अधिक लोक बेपत्ता झाले. बाजारपेठा, वस्त्या, आणि गुरेढोरेही पाण्यात वाहून गेले.

आज पंजाबमध्ये चौदाशे गावं अतिवृष्टीमुळे पाण्याखाली आहेत. या अतिवृष्टीमुळे 37 जण मृत्युमुखी पडले असून तीन लाख एकरपेक्षा जास्त क्षेत्र प्रभावित झाले आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये यंदा मे आणि ऑगस्ट मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विचित्र पद्धतीने प्रभावित झाल्याचे सगळ्यांनी पाहिले. असेच अतिवृष्टीचे यापूर्वी कधी न झालेले प्रकार पुणे आणि नागपूर शहरात झाले आणि शहर बुडू लागल्याचे एकंदरीत चित्र दिसून आलं. मराठवाड्यातील नांदेडमध्ये पावणेतीन तासात नदीची पाणीपातळी 24 ft पेक्षा जास्त वाढली. नांदेडमधील पूरामुळे शेती, घरे, आणि पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले.

पृथ्वी सहा खंडांमध्ये विभागली गेली आहे. आज परिस्थिती अशी आहे की एकाही खंडावर नैसर्गिक आलबेल अशी परिस्थिती नाही. ढगफुटी, महापूर, वनवे, उष्ण लहरी, भूस्खलन, अतिवृष्टी, दुष्काळ अशा नानाविध नैसर्गिक संकटांनी पृथ्वीचे सगळे खंड प्रभावित झाले आहेत.

बांबू : शाश्वत विकासाचा कल्पवृक्ष

हरित आच्छादन वाढवावे लागणार आहे आणि दुसऱ्या बाजूला जमिनीच्या पोटातले जीवाश्म इंधन वापरणे बंद करावे लागणार आहे. आणि हे केले नाही तर एक किलो दगडी कोळसा किंवा एक लिटर पेट्रोल जाळून निर्माण होणारे कार्बन उत्सर्जन संपण्यासाठी पुढील शंभर वर्षे देखील कमी पडतील. याला उत्तर एकच आहे की जमिनीच्या पोटा खालील डिझेल आणि पेट्रोल कोळसा वापरणे बंद करणे.

संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी जुलै 2023 मध्ये एका निवेदनात असे म्हटले होते की, “जागतिक तापमानवाढीचे युग (era of global warming) संपले आहे, आणि आता जागतिक होरपळीचे युग (era of global boiling) सुरू झाले आहे. आता तातडीच्या उपायांची गरज आहे” त्यांनी हे विधान 2023 मध्ये जगभरात झालेल्या अभूतपूर्व उष्णतेच्या लाटा, जंगलातील आगी आणि इतर हवामान-संबंधित आपत्तींच्या पार्श्वभूमीवर केले होते. 2025 पर्यंत, ही परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे, आणि तातडीच्या उपाययोजनांची गरज त्यांनी वारंवार अधोरेखित केली आहे.एक लढाई जीवाश्म इंधन ( Fossils Fuel) विरोधात जैवइंधन (Biofuel) अशी देखील आहे. त्यासाठी गंभीरपणे धोरणांची अंमलबजावणी करावी लागणार आहे.

बांबू हे अतिशीघ्र वेगाने वाढणारे गवत वर्गीय वनस्पती पीक आहे. काही प्रजाती (उदा., Dendrocalamus giganteus) दररोज 91 सें.मी. (36 इंच) पर्यंत वाढू शकतात. यामुळे बांबूला “टिम्बर ऑफ द ट्वेंटी-फर्स्ट सेंचुरी” असे संबोधले जाते. सामान्यतः बांबू 3-5 वर्षांत परिपक्व होतो, तर पारंपरिक झाडांना (उदा., साग, ओक) परिपक्व होण्यासाठी 20-50 वर्षे लागतात. बांबू हे डिझेल, पेट्रोल आणि कोळशाला पर्याय ठरणारे पीक आहे. त्याचबरोबर जंगलतोड रोखणे, ऑक्सिजनचा मुबलक पुरवठा करणे, कार्बन उत्सर्जन कमी करणे, उष्मा कमी करणे अशा सगळ्याच वातावरण बदलाच्या संकटांना रोखणारा कल्पवृक्ष म्हणजे बांबू होय. एक ब्रीद वाक्य तयार केले आहे ते सांगतो की ‘Save Earth with Bamboo’.

बांबू लागवडीसाठी शासनाचे अनुदान

माणसाला दरवर्षी २८० किलो ऑक्सीजन लागतो. दिवसाला तीन फूट वाढणारा बांबू एका वर्षात 320 किलो ऑक्सीजन निर्मिती करतो आणि 35 टक्के कार्बन शोषून घेतो.

मग्रारोहयो योजनेतून महाराष्ट्र सरकार हेक्टरी 7 लाख चार हजार रुपयांचे अनुदान देत आहे. यामध्ये मजुरी आणि खड्डे खणणे तसेच रोपांचा पुरवठा करण्याच्या खर्चाचा देखील समावेश आहे.

आंतराष्ट्रीय बांबू परिषद : नव्या दिशेची सुरवात

1750 मध्ये इंग्लंडच्या ग्लासगो शहरात पहिले इंजिन फिरले. हवेतला ऑक्सिजन खाऊन कार्बन वाढवत नेला, तापमान वाढवले. गेल्या 250 वर्षात इंजिन वापरून वस्तू तयार केल्या. आता याच विकासातून पृथ्वीवरचा माणूस शिल्लक राहील की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. तुम्हाला विकास हवा की प्रदूषणकारी यंत्रापासून निर्मित वस्तू? वस्तू वापरण्यासाठी माणूस देखील आवश्यक आहे. 1750 मध्ये विकासासाठी निर्माण झालेले मॉडेल आता उलटे फिरवावे लागणार आहे. हे असेच सुरू राहिले तर 2050 नंतर मानव जातीची अवस्था नरकात राहिलेले बरे पण पृथ्वीवर नको अशी होणार आहे. सावध ऐका पुढील हाका, अशी आताची परिस्थिती आहे. मानव जात वाचवण्यासाठी जीवाश्म इंधन (Fossile fuel) विरुद्ध जैवइंधन (Bio Fulel) अशी लढाई लढावी लागणार आहे. जैवइंधन निर्मितीसाठी बांबू हे चांगले शस्त्र आपल्या हाती मिळाले आहे. 14 सप्टेंबर 2025 रोजी आसाममधील नुमालीगड या ठिकाणी बांबूवर आधारित इथेनॉल निर्मितीचा प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्राला अर्पण करणार आहेत. ही घटना देशाला आणि जगाला नवी दिशा दाखवण्याचा प्रयत्न आहे. म्हणूनच येत्या 18 आणि 19 सप्टेंबर 2025 रोजी आंतरराष्ट्रीय बांबू दिनाचे औचित्य साधत या सर्व गोष्टींची सांगोपांग चर्चा करण्यासाठी जगभरातील तज्ज्ञ, अभ्यासक, शास्त्रज्ञ, उद्योजक, शेतकरी आणि धोरणकर्ते यांना मुंबईमधील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात निमंत्रित करण्यात आले आहे. मानव जातीच्या अस्तित्वासाठी महत्त्वपूर्ण चर्चा आणि दोन दिवसाच्या परिषदेचे आयोजन हे फिनिक्स फाउंडेशन, लोदगा जि.लातूर आणि आणि राज्य सरकारची महाराष्ट्र सरकारच्या “महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन” (MITRA) संयुक्तपणे केले आहे. काळाची पाऊले ओळखून मानव जातीच्या रक्षणासाठी 18 आणि 19 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या परिषदेमध्ये होणाऱ्या दोन दिवसाच्या चर्चासत्रांमध्ये बांबूपासून इथेनॉल, मिथेनॉल, थर्मल साठी बांबू पॅलेट्स, लोखंड चारकोल, लाकूड, फर्निचर, बांबू कपडे असे अनेक उद्योग, कौशल्य, पर्यावरण, प्लास्टिक मुक्तीतून शाश्वत म्हणजेच सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या दिशेने वाटचाल अपेक्षित असणार आहे. शहरी वनीकरण (Urban Forest), ऑक्सीजन पार्क, ग्रीन बिल्डिंग अशा अनेक नवकल्पना या परिषदेतून पुढे येणार आहेत.

आयपीसीसी म्हणजे (Intergovernmental Panel on Climate Change) च्या म्हणण्यानुसार आपण अजूनही ही परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न नाही केला तर येत्या काही काळात 40 टक्के धान्य, दूध, मासे उत्पादन कमी होणार आहे. हे आपणा सर्वांना परवडणार आहे का? आज देशाच्या अन्नधान्याचे कोठार असलेल्या पंजाब आणि हरियाणामध्ये हाहाकार माजला आहे. त्यांचा खरीप पाण्यात गेला आहे. परिणामी देशाची धान्य कोठार पाण्यात बुडाली. हे एकदा नाही तर आता यापुढील काळात वारंवार घडणार आहे. चला तर यातूनच मार्ग काढण्यासाठी एकत्र येऊन चिंतन आणि मनन करूया.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!