अखेर मालवण येथील किल्ले सिंधुदुर्ग च्या होडी सेवेला मिळाला मुहूर्त..

सिंधुदुर्ग : २० मे पासून बंद असलेली किल्ले सिंधुदुर्ग होडी सेवा गुरूवारपासून सुरू झाली. १ सप्टेंबरपासून मालवणच्या पर्यटन हंगामाला प्रारंभ झाला असला तरी प्रत्यक्षात गुरूवारपासून पर्यटन हंगामाचा श्रीगणेशा झाला आहे.
किल्ले सिंधुदुर्ग येथे जाण्यासाठी गुरूवारी दोन होड्या समुद्रात उतरल्या होत्या. दोन होड्यांमधून सुमारे ३०० पर्यटकांनी किल्ले सिंधुदुर्गला भेट दिली. पावसाळी वातावरण आणि समुद्रातील परिस्थिती पाहून किल्ला होडी सेवा सुरू करण्यात आली. १ सप्टेंबरपासून जलपर्यटनाचा मुहूर्त होता. पण हवामानातील बदलामुळे तो मुहूर्त हुकला होता. त्यानंतर पर्यटकांसाठी किल्ले सिंधुदुर्ग महत्वाचा असल्याने होडी सेवेकडे सर्वांचे लक्ष लागून होते. त्यामुळे पर्यटकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करत होडी सेवेद्वारे किल्ले सिंधुदुर्गला भेट दिली. पहिल्या होडीतून प्रवास करणाऱ्या पर्यटकांचे स्वागत करण्यात आले.






