अखेर १८ ते ४४ वयोगटाच्या लसीकरणास लावला ब्रेक!
लस तुवटड्यामुळे राज्याने घेतला निर्णय-आरोग्यमंत्री राजेश टोपे
मुंबई, दि.१२:१ मे पासून लस नसतानासुद्धा राज्य सरकारने मोठ्या जोमात प्रारंभ केलेल्या १८ ते ४४ वयोगटाच्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणास ब्रेक लागला आहे. त्यासंदर्भातली घोषणा राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी केली. लस तुवटवड्यामुळे तूर्त या गटाचे लसीकरण थांबवण्यात येत असल्याचे टोपे म्हणाले.
१ मे पासून केंद्र सरकारने १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यास राज्यांना परवानगी दिली होती. अर्थात, या वयोगटासाठी लस खरेदी राज्याने करायची होती. १ मे हा लस टोचण्याचा राज्य स्थापना दिनाचा मुहूर्त पकडण्यासाठी अपुऱ्या लसीच्या पुरवठ्यावर राज्य सरकारने प्रारंभ केला होता. आजपर्यंत या गटाच्या ५ लाख नागरिकांना पहिला डोस दिला आहे.
टोपे म्हणाले की, दुसऱ्या डाेसच्या प्रतिक्षेत राज्यात २० लाख नागरिक आहेत. या गटासाठी लस पुरवठा करण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. मात्र लसीचा देशात मोठा तुटवडा असल्याने दुसऱ्या डोसच्या प्रतिक्षेतील नागरिकांची ४५ ते ६० दिवसांची मुदत संपत आहे. म्हणून १८ ते ४४ वयोगटासाठी राज्याने खरेदी केलेली लस ४५ वयाेगटाला वापरण्याचा निर्णय राज्याने घेतला असल्याचे टोपे यांनी मंत्रीमंडळ बैठकीनंतर सांगितले.
२० मे नंतर सीरम इन्स्टिट्यूटने राज्याला प्रतीमाह १ कोटी लस डोस देण्याचे आश्वासन दिले आहे. ती लस मिळताच पुन्हा १८ ते ४४ वयोगटाच्या नागरिकांचे लसीकरण सुरु होईल, असे टोपे यांनी आश्वस्त केले. १८ ते ४४ वर्षातील ज्या नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. त्यांनी काळजी करु नये, त्यांना वेळेत दुसरा डोसही दिला जाईल, असे टोपे यांनी सांगतिले.
राज्यात १६ लाख नागरिक कोविशील्डसाठी तर ४ लाख नागरिक कोव्हॅक्सीनच्या लशीच्या दुसऱ्या डोसच्या प्रतिक्षेत आहेत. राज्याकडे सध्या ७ लाख कोविशिल्डचे तर ३ लाख कोव्हॅक्सीनचे डोस आहेत, असे मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.




