मुंबई,दि.१४:अरबी समुद्रात दक्षिण-पूर्व भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून पुढील २४ तासांत त्याचे रुपांतर चक्रीवादळात होणार आहे. या वादळाला म्यानमारने तौंते(Cyclone Tauktae) असे नाव दिले आहे. हे वादळ १५ व १६ मे दरम्यान कोकणात धडकण्याची शक्यता आहे. गोव्यासह कोकण किनारपट्टीवरील सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांना सर्वप्रथम या वादळाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. त्याचवेळी १६ आणि १७ मे रोजी रायगड, ठाणे पालघर आणि मुंबईत या वादळाचा प्रभाव दिसेल, असे भारतीय हवामान विभागाच्या वैज्ञानिक शुभांगी भुत्ये यांनी दिली आहे. या दरम्यान वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
कोकण किनारपट्टीवर तौंते चक्रीवादळाचे संकट घोंगावत असताना किनारपट्टीवरील सर्व जिल्ह्यांत प्रशासन अलर्ट मोडवर असून आवश्यक ती सर्व पावले उचलण्यात येत आहेत. दरम्यान, या वादळाचा सर्वाधिक धोका कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याला असून वादळाआधी आज जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाने धडक दिली. कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग या तालुक्यांत आज मुसळधार पाऊस झाला. जिल्ह्यात पुढील पाच दिवस मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्याचवेळी मच्छिमारांनाही समुद्रात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
चक्रीवादळ तौंते हे शनिवार सकाळपर्यंत त्याच भागात असेल. त्यानंतर रविवारी (१६ मे) चक्रीवादळामध्ये तीव्रता येईल.यामुळे देशाच्या दक्षिणेकडील भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. चक्रीवादळात वेगाने होणारी वाढ लक्षात घेता भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) महाराष्ट्र व गुजरातच्या काही भागात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.