बोरीवली ठाणे भूयारी मार्गासाठी प्रबोधनकार ठाकरे ग्रंथालयाचा बळी ; ३० हजार बहुमूल्य पुस्तकांचा ठेवा वाऱ्यावर ?

मुंबई : बहुप्रतिक्षित बोरीवली ठाणे भूयारी मार्गाचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने निधी मोकळा केल्याने झपाट्याने मार्गी लागणार असून या भूयारी मार्गासाठी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांचे पिताश्री, थोर समाजसेवक आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रणी कै. केशव सीताराम उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांच्या नांवाने गेल्या ४८ वर्षांपासून वाचकांची भूक भागविणारे ग्रंथालय/वाचनालय बळी जाणार की काय ? असा गंभीर प्रश्न मुंबई उपनगरवासियांना पडला आहे. ज्येष्ठ राजकीय विश्लेषक, समाजसेवक विजय वैद्य यांनी महत्प्रयासाने १ मे १९७७ रोजी बोरीवली पूर्व येथील जय महाराष्ट्र नगर येथे मागाठाणे मित्र मंडळ स्थापन केले. मागाठाणे मित्र मंडळ संचालित कै प्रबोधनकार ठाकरे ग्रंथालय उभारण्यात आले. तसेच मातोश्री रमाबाई केशव ठाकरे बालवाडी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर व्यायामशाळा उभारण्यात आली. या ग्रंथालयाला महाराष्ट्र शासनाची मान्यता असून ब वर्गाचा दर्जा प्राप्त झाला आहे.
विजय वैद्य यांनी जय महाराष्ट्र नगर येथील आपल्या सहकारी बांधवांबरोबर घरोघरी जाऊन विविध दर्जेदार पुस्तके या कै प्रबोधनकार ठाकरे ग्रंथालयासाठी प्राप्त केली. सुमारे ३० हजार पुस्तकांचा बहुमूल्य ठेवा या ग्रंथालयात उपलब्ध आहे. या मागाठाणे मित्र मंडळ संचालित कै प्रबोधनकार ठाकरे ग्रंथालयाला दस्तुरखुद्द हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, युवा सेना प्रमुख माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पासून असंख्य मान्यवरांनी भेटी दिल्या आहेत. ख्यातनाम साहित्यिक शिवाजीराव भोसले यांच्या सह असंख्य साहित्यिकांची मांदियाळी या ग्रंथालयाने जवळून पाहिली आहे. याच मागाठाणे मित्र मंडळ संचालित कै प्रबोधनकार ठाकरे ग्रंथालयाच्या विद्यमाने विजय वैद्य यांनी सर्वात पहिले मुंबई उपनगर मराठी साहित्य संमेलन भरविले होते ज्याला उत्स्फूर्त आणि प्रचंड प्रतिसाद मिळाला.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला असून वाचन संस्कृती वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. एका बाजूला जम्मू काश्मीर मध्ये पुस्तकांचे गांव उभे करण्याची घोषणा करण्यात आली असतांना बोरीवली ठाणे भूयारी मार्गासाठी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांचे वडील आणि थोर समाजसेवक कै प्रबोधनकार ठाकरे यांच्या नांवाने उभ्या असलेल्या परंपरागत वाचनालयावर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा हातोडा पडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हे ४८ वर्ष जुने ग्रंथालय पाडून ते थेट चारकोप कांदिवली येथे हलविण्यात यावे अशी सूचना (नोटीस) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मागाठाणे मित्र मंडळाला दिली असून ३० हजार पुस्तके वाऱ्यावर सोडून देण्यात येणार की काय ? अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे.
अनेक लोकप्रतिनिधी यांच्या सह हजारो आबालवृद्ध वाचक या पुस्तकांसाठी, वाचनासाठी चारकोप कांदिवली येथे कसे जाणार ? या हजारो वाचकांना पुस्तके वाचावयास कशी मिळणार? असा सवाल विचारण्यात येत असून बोरीवली येथील माजी आमदार, माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी त्यांच्या कारकिर्दीत महाबळेश्वर जवळ पुस्तकाचे गांव उभे केले होते. सांस्कृतिक कार्य मंत्री आणि ऐतिहासिक ठेवा महाराष्ट्रात आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न करणारे ॲड आशिष शेलार हे मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने महायुती सरकार वाटचाल करीत असल्याचे सांगणारे महायुती सरकार बाळासाहेब ठाकरे यांच्या वडिलांच्या नांवाचे कै प्रबोधनकार ठाकरे ग्रंथालय, मातोश्री रमाबाई केशव ठाकरे बालवाडी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर व्यायामशाळा वाचविण्यासाठी आणि याच जय महाराष्ट्र नगर परिसरात पर्यायी जागा उपलब्ध करुन देऊन वाचकांना दिलासा देत हजारो पुस्तकांचा ठेवा, बालवाडी आणि व्यायामशाळा संरक्षित करुन पर्यायाने वाचन संस्कृती आरोग्यसंपन्न महाराष्ट्र वृद्धिंगत करण्यासाठी हातभार लावणार काय याकडे उपनगरवासियांचे डोळे लागले आहेत.