कृष्णाभाऊ, शतकवीर व्हा ! – योगेश त्रिवेदी

लॉकडाऊन/अनलॉकच्या वातावरणात दूरदर्शनवर रामानंद सागर आणि बी. आर. चोप्रा यांच्या रामायण, महाभारत या सुमारे पंचवीस तीस वर्षांपूर्वी गाजलेल्या ऐतिहासिक, पौराणिक मालिकांचे पुनर्प्रक्षेपण करण्यात आले. रामानंद सागर यांची श्रीकृष्ण ही मालिका तुफान लोकप्रिय झाली आहे. या मालिकेत सर्वदमन बॅनर्जी यांनी भगवान श्रीकृष्ण यांची भूमिका वठविली असून आता श्रीकृष्ण अर्जुनाला युद्धासाठी तयार करीत आहेत. श्रीकृष्णाने आपले विराट स्वरूप दाखविले आहे आणि जीवन जगण्याची संपूर्ण कार्यपद्धती विषद केली आहे. यात ‘निष्काम कर्मयोग’ हा महत्त्वाचा संदेश दिला आहे. श्रीमद्भगवद्गीता हे संपूर्ण जीवन कसे जगावे याचे मार्गदर्शन, दिशा दिग्दर्शन आहे.
आजच्या कलीयुगात हे सर्व सांगणे म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी असं असलं तरी समाजात आजही काही व्यक्ती अशा आहेत की ज्यायोगे भगवान श्रीकृष्ण यांचा संदेश तंतोतंत अंमलात आला आहे, असे दिसून येते. यातच एक व्यक्ती म्हणजे श्री. कृष्णाभाऊ शेवडीकर ! माझ्या पेक्षा कृष्णाभाऊ मोठे असले तरी ते अन्य मित्रांप्रमाणे मला ‘गुरुजी’, ‘गुरुवर्य’ संबोधतात. हा त्यांच्या मनाचा मोठेपणाच म्हणावा लागेल. कृष्णाभाऊ हे खरोखरच निष्काम कर्मयोगी आहेत. मराठवाड्यात नांदेड येथून श्रमिक एकजूट हे दैनिक गेल्या पन्नास वर्षापासून नित्यनियमाने ते चालवितात आणि संपूर्ण मराठवाडा त्यांनी व्यापलेला आहे.
पत्रकार हा खरा समाजसेवक असतो. तो समाजाचा आरसा असतो. आपण आचार्य बाळशास्त्री जांभेकर, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, गोपाळ गणेश आगरकर यांची परंपरा सांगतो. अगदी आता आतापर्यंत पत्रकारिता कशी करावी याचा मापदंड असलेले रामभाऊ जोशी, दिनू रणदिवे, मधू शेट्ये, पंढरीनाथ सावंत, विजय वैद्य हे काळाच्या पडद्याआड गेले. ‘पत्रकारिता हे सतीचे वाण’, ‘पत्रकारिता म्हणजे असिधारा व्रत’ हे आता केवळ बोलण्यापुरते, ऐकण्यापुरते म्हणावे लागेल. पण नाही, हे जर खऱ्याअर्थाने आपल्याला पहायचे असेल, अनुभवायचे असेल तर कृष्णाभाऊ शेवडीकर यांच्याकडे पाहिल्यावर लक्षात येईल.
कृष्णाभाऊ यांचा स्वभाव सर्वांशी मिळून मिसळून वागण्याचा. कधीही कुणावर रागावलेले त्यांना पाहिलेले नाही. प्रत्येक गोष्ट समजावून सांगणार. आणि हे मी तुमच्या साठी केले असे कधीच ते दाखवून देणार नाहीत, भासवून देणार नाहीत. भगवान श्रीकृष्ण यांचा ‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन’ हा मूलमंत्र ते खऱ्याअर्थाने पाळतात म्हणण्यापेक्षा तो मंत्र ते खऱ्याअर्थाने जगत आले आहेत. ज्येष्ठ पत्रकार आणि आहुतिकार वसंतराव त्रिवेदी म्हणजे माझे वडील यांच्या समवेत कृष्णाभाऊ शेवडीकर आणि रवींद्र बेडकीहाळ यांनी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेत एकत्र काम केले आहे. सोलापूरच्या रंगाआण्णा वैद्य, अमरावतीच्या हिंदुस्थानचे संस्थापक बाळासाहेब मराठे, बेळगावच्या बाबूराव ठाकूर, पुण्याचे वसंतराव काणे, नांदेडचेच सुधाकरराव डोईफोडे, सूर्यकांता पाटील, रायगडच्या मिनाक्षीताई पाटील, जळगावचे ब्रिजलालभाऊ पाटील, धुळ्याचे भाई मदाने, मुंबईचे कुमार कदम, यशवंत उर्फ नाना मोने, नाशिकचे चंदुलाल शाह अशा अनेकांबरोबर कृष्णाभाऊ शेवडीकर यांनी पत्रकारांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे.
स्वतः चे दैनिक एकीकडे नियमित चालवितांनाच दुसरीकडे पत्रकारांच्या, वर्तमानपत्रांच्या अडीअडचणी सरकार दरबारी मांडून त्या यशस्वीपणे सोडविण्यासाठी शेवडीकर, बेडकीहाळ जोडीने अथक परिश्रम घेतले आहेत. महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी तसेच संपादक परिषद सुद्धा यशस्वीपणे हे दोघे सांभाळतात. मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाने माझी शिफारस केल्यामुळे मला राज्य अधिस्वीकृती समितीवर २०१६ ते २०१८ अशी तीन वर्षे काम करण्याची संधी मिळाली. या निमित्ताने विद्यमान अध्यक्ष यदूनाथ जोशी यांच्या नेतृत्वाखाली कृष्णाभाऊ शेवडीकर, रवींद्र बेडकीहाळ, विलासराव मराठे, सुधीर महाजन, प्रकाश कुलथे, धनंजय जाधव, प्रसाद काथे, विनोद जगदाळे, शंतनू डोईफोडे अशा अनेकांबरोबर काम करण्याचा योग आला आणि त्यानिमित्ताने सर्वांच्या स्वभाव गुणांचा परिचय झाला. याच निमित्ताने मी श्रमिक एकजूट या दैनिकाचा लेखक म्हणून परिचित झालो.
कृष्णाभाऊ यांच्या श्रमिक एकजूट मुळे (आधीच ज्या मराठवाड्यात दैनिक सामना मुळे परिचित झालो होतो तो आणखीनच) मराठवाड्यात माझा नावलौकिक सर्वदूर पोहोचला. शतकवीर संसदपटू केशवराव धोंडगे या महाराष्ट्रात एक काळ गाजवलेल्या शेतकरी कामगार पक्षाच्या झुंझार नेत्यांनी ४ ऑगस्ट २०१९ रोजी सकाळी ९ वाजून ७ मिनिटांनी मला भ्रमणध्वनी वरुन, “देवा, आपण आमची जाणीव ठेवलीत” असे सांगितले. माझी पत्रकारिता खऱ्याअर्थाने धन्य झाली. ज्या केशवराव धोंडगे यांनी लोकसभा आणि विधानसभा गाजविल्या, त्या सभागृहात त्यांचे कार्य जवळून पाहण्याची संधी ‘सामना’मुळे उपलब्ध झाली. त्याच केशवरावांकडे त्यांच्याच शेतकरी कामगार पक्ष आणि सरकारने दुर्लक्ष केले ही बाब मी श्रमिक एकजूट च्या माध्यमातून समोर आणतांना ‘दिवंगतांची जन्मशताब्दी जोरात आणि हयात शतकवीर कोनाड्यात’ असे प्रहार केले. या बद्दल केशवरावांनी माझे कौतुक करुन शाबासकीची थाप मारली, याचे संपूर्ण श्रेय खऱ्याअर्थाने कृष्णाभाऊ शेवडीकर यांनाच द्यावे लागेल.
याच लेखावर दत्तात्रय कराळे या ज्येष्ठ पत्रकार यांची विस्तृत प्रतिक्रिया सुद्धा कृष्णाभाऊ शेवडीकर यांनी श्रमिक एकजूट मध्ये प्रसिद्ध केली. विजय वैद्य, गिरीश त्रिवेदी, प्रवीण कारखानीस, वीणा गावडे, शशीकला रेवणकर, प्रा. नयना रेगे, सुजाता जोग, रेखाताई बोऱ्हाडे, जयंत करंजवकर, खंडुराज गायकवाड, किशोर आपटे, सुहास पटवर्धन, विजय शिंदे, हेमंत थोरवे, वंदना साळसकर साखळे, अजय वैद्य, मनीषा रेगे, दिलीप मालवणकर ही मंडळी सुद्धा श्रमिक एकजूटच्या परिवारात जोडली गेली. निष्काम कर्मयोगी म्हणून मी कृष्णाभाऊ शेवडीकर यांना म्हणतो त्याचे कारण त्यांनी आपला आदर्श डॉ. प्रकाश बाबा आमटे यांना मानले आहे. महाराष्ट्र भूषण बाबा आमटे यांच्या कार्याचा वारसा जे खऱ्याअर्थाने चालवितात त्या डॉ. प्रकाश बाबा आमटे यांना आजच्या भाषेत आपला आयकॉन, रियल हिरो म्हणून जर कृष्णाभाऊ आपला आदर्श मानत असतील तर कृष्णाभाऊ हे निष्काम कर्मयोगी निश्चितच बनू शकतात, नव्हे मी तर त्यांना नक्कीच ही बिरुदावली त्यांच्या नावापुढे लावेन. अशा या ज्येष्ठ पत्रकाराने आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेचा लाभ विनम्रपणे नाकारला आहे.
सोयी, सवलतीच्या मागे धावणाऱ्यांच्या जमान्यात विनम्रपणे लाभ नाकारणारा कृष्णाभाऊ शेवडीकर यांच्या सारखी व्यक्ती निश्चितच आदरास पात्र ठरते अभिमानास पात्र ठरते. श्रमिक एकजूट आणि कृष्णाभाऊ शेवडीकर यांच्या मुळे नांदेड येथील डॉ. विलास कुमठेकर यांच्या सारख्या एका प्रकांडपंडिताचा परिचय झाला. त्यांचे आणि माझे सतत बोलणे सुरु असायचे. असायचे यासाठी की विलास कुमठेकर या तपस्वी व्यक्तिमत्वाचा कोरोना या महामारीने बळी घेतला. विलासराव कुमठेकर यांनी रक्ताच्या कर्करोगावर मात केली पण कोरोनाला ते हरवू शकले नाहीत. त्यांच्या सोबतच्या बोलण्यातून कृष्णाभाऊ शेवडीकर यांचा संदर्भ, उल्लेख हमखास येणारच. नांदेड चे हे दोघे राम लक्ष्मण म्हणायला हवेत. केशवराव धोंडगे, दत्ता ताम्हाणे, हुसेन दलवाई, रामभाऊ जोशी, जी. जी. पारिख अशा दिग्गजांच्या शतकी कारकीर्दीचा पाठलाग करीत कृष्णाभाऊंनीही शतकवीर व्हावे.
आज ते आपल्या वयाच्या अमृतमहोत्सवी वर्षात प्रवेश करीत आहेत. त्यांनी समाजाला सदैव मार्गदर्शन करावे अशी जगन्नियंत्याकडे प्रार्थना करतांनाच या निष्काम कर्मयोगी कृष्णाभाऊ शेवडीकर यांना उदंड आयुष्य आणि ठणठणीत आरोग्य प्राप्त होवो, श्रमिक एकजूट ची पताका दिमाखदार पणे फडकत राहो, या मनःपूर्वक शुभेच्छा !
– योगेश वसंत त्रिवेदी,
९८९२९३५३२१.
(लेखक ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आहेत)