चिपळूण नगराध्यक्ष पदाच्या मैदानात ज्येष्ठ पत्रकार सतीश कदम यांची एन्ट्री..

चिपळूण; जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते सतीश कदम यांनी नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून त्यांनी तयारी देखील सुरू केली आहे. चिपळूण शहरातील जनता नवा पर्याय आणि नवा चेहऱ्याच्या प्रतीक्षेत असून यावेळी शहरातील नागरिकांची इच्छा पूर्ण होईल असे नमूद करत त्यांनी निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचे स्पष्ट केले आहे. चिपळूण नगर परिषदेचे नगराध्यक्ष पद या वेळी सर्वसाधारण वर्गासाठी खुले झाले आहे. सुमारे साडेसतरा वर्षानंतर सर्वसाधारण वर्गाला ही संधी प्राप्त झाली असून प्रत्येक राजकीय पक्षात उमेदवार चाचपणी सुरू झाली आहे. तसेच नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक म्हणून अनेकांची नावे समोर येत आहेत. महायुती, महाविकास आघाडी की स्वबळ हे चित्र अद्याप स्पष्ट झाले नसले तरी प्रत्येक पक्षात इच्छुकांची यादी दिवसेंदिवस वाढू लागली असून वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यामध्ये आता पत्रकार सतीश कदम यांनी उडी घेत चांगलीच खळबळ उडवून दिली आहे.