महाराष्ट्राचा विकास मराठी माणसाला संपवून होत असेल, तर खपवून घेणार नाही-राज ठाकरेंचा इशारा…

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज गोरेगाव येथे पार पडलेल्या मेळाव्यात केंद्र-राज्य सरकार तसेच अदानी-अंबानींवर तीव्र हल्ला चढवला. महाराष्ट्राचा विकास मराठी माणसाला संपवून होत असेल, तर खपवून घेणार नाही, असा इशारा त्यांनी या वेळी दिला.
ठाण्यातील नॅशनल पार्कमधील जंगलतोड करून अदानीला प्रकल्प देण्याचा गंभीर आरोप करत, मराठी हिताविरोधात motha ‘प्लॅन’ सुरू असल्याचा दावा देखील त्यांनी केला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत मेळावा घेतला. या मेळाव्यात त्यांनी केंद्र सरकार, राज्य सरकार, मोठे उद्योजकांवर थेट हल्लाबोल केला. सी-लिंक, अटल सेतू या सर्व योजना तुमच्यासाठी नाहीत. महाराष्ट्राची प्रगती मराठी माणसाला संपवून होत असेल तर आपण ते खपवून घेणार नाही, असा इशारा राज ठाकरेंनी दिला.
राज ठाकरे यांनी पदाधिकारी मेळाव्यात विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी राज ठाकरे यांनी भाजप, अदानी, अंबानी आणि गुजरातचा उल्लेख करत गंभीर आरोप केले. हे लोक मराठी माणसांचं जेवढं अस्तित्व आहे ते मिटवायला येत आहेत. भाजप, अदानी, अंबानी आणि गुजरातचा वरवंटा जेव्हा महाराष्ट्रावर फिरेल तेव्हा ते तुम्हाला बघणार नाहीत ते तुम्हाला त्या वरंवट्याखाली मराठी म्हणूनच घेणार आहेत. सर्व गोष्टीमध्ये अदानी सुरु आहे, असे राज ठाकरे म्हणाले.
नॅशनल पार्कमधील जंगल तोडणार
यावेळी राज ठाकरेंनी ठाण्यातील नॅशनल पार्काचा आरोप केला. प्रगतीच्या नावाखाली होणाऱ्या गोष्टींवर राज ठाकरेंनी आक्षेप घेतला. त्यांनी ठाण्यातील नॅशनल पार्कमधील एका जागेचा मुद्दा उपस्थित केला. “ठाण्यातील नॅशनल पार्कमध्ये एक जागा बघितली आहे. हा भाग ठाण्यात येतो. तिथे जंगल तोडणार आहे. तिकडच्या आदिवासींना हटवलं जाणार आहे आणि हा सर्व भाग अदानीला दिला जाणार आहे, मग पॉवर प्रोजेक्ट टाकणार आहेत,” असा थेट आरोप राज ठाकरेंना केला.
मी प्रगतीच्या आड येणारा माणूस नाही. पण मुंबई आणि महाराष्ट्रात होणारी प्रगती ही मराठी माणसाच्या थडग्यावर होणार असेल, तर मी खपवून घेणार नाही. तुम्हाला वाटत असेल हे रस्ते तयार करण्यात येत आहेत किंवा तुमच्यासाठी सी-लिंक, अटल सेतू या सर्व योजना तुमच्यासाठी नाहीत. हे जे उद्योगपती जमिनी घेत सुटले आहेत, त्यांच्यासाठीचे रस्ते आहेत, असे राज ठाकरे म्हणाले.
सर्व गोष्टीत हात घातला जात आहे. जिथे नजर पडेल ते सर्व पाहिजे आहे. आमच्याकडे कुंपणचं शेत खात आहे. आमचीच मराठी माणसं यांना जमीन मिळवून देतात. काही मराठी लोक दलाल म्हणून यांच्यासाठी काम करतात. केंद्र आणि राज्यामध्ये सत्ता आहे आणि जर जिल्हा परिषदा आणि महापालिकाही हातात आल्या, तर रानच मोकळं होईल. हे सर्व सहज नाही, तर प्लॅन असल्याचा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केला.