दिलासादायक: जुलैपर्यंत कोरोनाची दुसरी लाट पूर्णपणाने ओसरणार..
नवी दिल्ली,दि.२१:भारतात कोरोनाची दुसरी लाट जुलैपर्यंत पूर्णपणाने ओसरणार असून त्या नंतर जवळपास सहा ते आठ महिन्यांनी कोरोना महामारीची तिसरी लाट येण्याची शक्यता भारत सरकारच्या विज्ञान मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या विज्ञान आणि औद्योगिकी विभागाने स्थापन केलेल्या तीन सदस्यांच्या समितीने व्यक्त केली आहे.
केंद्र सरकारलाही समितीने सावध राहण्यास सांगितले आहे. मे महिन्याच्या अखेरीस आणि जूनच्या सुरुवातीला कोरोनाचे रोज दीड लाख रुग्ण सापडणार आहेत. जूनच्या शेवटी रोज २० हजार नवे रुग्ण सापडतील. जुलैपर्यंत कोरोनाची दुसरी लाट संपण्याची शक्यता आहे.
डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी (DST)चे सेक्रेटरी आणि IIT कानपूरचे सीनियर प्रोफेसर डॉ. आशुतोष शर्मा म्हणाले की, डिसेंबरपर्यंत देशात हर्ट इम्यूनिटी तयार होईल. तेव्हा 60 ते 70% लोकसंख्येत अँटीबॉडी डेव्हलप होतील. यामुळे संक्रमणाच्या ट्रान्समिशनचा वेग खूप कमी होईल. प्रो. शर्मा म्हणाले की, जर सर्व काही नियोजनानुसार सुरू राहिले तर देश लवकरच महामारीवर विजय मिळवेल.