सार्वजनिक रुग्णालयांचे खासगीकरण थांबवा

मुंबई / रमेश औताडे
मुंबईतील सार्वजनिक आरोग्यसेवा आणि रुग्णालयांचे खासगीकरण करण्याच्या मुंबई महापालिकेच्या प्रयत्नांविरोधात आरोग्य कर्मचारी संघटना, सामाजिक संस्था आणि नागरिक संघटनांनी तीव्र आवाज उठवला आहे. या संघटनांनी एकत्र येऊन सार्वजनिक रुग्णालयांचे खासगीकरण थांबवण्याची आणि रिक्त पदांवर तातडीने नियमित भरती करण्याची मागणी केली आहे.
यावेळी बोलताना कामगार नेते अशोकराव जाधव म्हणाले, मुंबईतील महापालिका रुग्णालयांमध्ये डॉक्टरांच्या ४६ टक्के, नर्स व पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांच्या २६ टक्के, तर मजूर वर्गाच्या ४२ टक्के पदे रिक्त आहेत. एकूण ३६ टक्के पदे रिक्त राहिल्यामुळे रुग्णालयांची कार्यक्षमता कमी झाली आहे. परंतु, पुरेशा पात्र डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचा मोठा साठा उपलब्ध असून ही पदे तत्काळ भरता येऊ शकतात. असे अभय शुक्ला यांनी सांगितले.
खासगीकरण तातडीने रद्द करण्यात यावे, प्रकल्पांचे स्वतंत्र पुनरावलोकन करण्यात यावे, सर्व रिक्त पदांसाठी डॉक्टर, नर्स, पॅरामेडिकल आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांची तातडीने नियमित भरती करण्यात यावी. तसेच, सार्वजनिक आरोग्यसेवांसाठी लोकसंख्येच्या प्रमाणात पुरेसे बजेट वाढवावे या मागण्या करण्यात आल्या. आरोग्य चळवळी अंतर्गत नोव्हेंबर ३० रोजी मुंबईत राज्यस्तरीय परिषद आयोजित करण्यात आली आहे.






