मराठी एकीकरण समितीत मोठे फेरबदल; ‘कार्याध्यक्ष’सह सर्व पदे तत्काळ बरखास्त

संदिप सावंत
मुंबई : मराठी भाषा, शाळा, राज्य आणि संस्कृतीचे संवर्धन व विकास हे ध्येय असलेल्या मराठी एकीकरण समितीने (महाराष्ट्र राज्य) संघटनेत मोठे संघटनात्मक फेरबदल केले आहेत. समितीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे याची माहिती देत, ‘कार्याध्यक्ष’ आणि इतर सर्व प्रशासकीय पदे तत्काळ प्रभावाने बरखास्त केल्याची घोषणा केली आहे. समितीच्या सर्वसाधारण सभेमध्ये सर्वानुमते व व्यापक विचारविनिमयानंतर संघटनात्मक पुनर्रचनेचा हा महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आला. संघटन वाढीसाठी व अधिक प्रभावी कार्यप्रणालीसाठी पुनर्रचना अत्यावश्यक असल्याचे सांगत, समितीने खालील निर्णय घेतले.
समितीमधील ‘कार्याध्यक्ष’ तसेच सर्व विभागीय, जिल्हा, शहर व इतर प्रशासकीय/नामांकित पदे (उदा. उपाध्यक्ष, जिल्हा/शहर अध्यक्ष, सहसचिव, प्रवक्ते, प्रमुख, समन्वयक इ.) या क्षणापासून तत्काळ प्रभावाने बरखास्त करण्यात आली आहेत. बरखास्त केलेल्या कोणत्याही पदाचा यापुढे वापर करणे, उल्लेख करणे किंवा त्या नावाने कामकाज करणे यास सक्त मनाई आहे. संघटनात्मक पुनर्रचना प्रक्रिया पूर्ण झाल्यावर जानेवारी २०२६ किंवा नियोजित कालावधीमध्ये नवीन पदनियुक्ती करण्यात येईल.
’मराठी शिलेदार’ हेच हंगामी पदनाम
पुनर्रचना होईपर्यंतच्या हंगामी कालावधीसाठी, समितीतील सदस्यांना कोणतेही बरखास्त केलेले पदनाम वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याऐवजी, सर्व सदस्यांनी आपले पदनाम केवळ “मराठी शिलेदार” हेच वापरावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. अंतरिम कालावधीसाठी केवळ चार पदे नवीन निवड होईपर्यंतच्या हंगामी/अंतरिम कालावधीसाठी समितीमध्ये केवळ अध्यक्ष (गोवर्धन देशमुख) सचिव (कृष्णा जाधव) खजिनदार ( प्रमोद पार्टे) व सर्व नोंदणीकृत सदस्य पदांव्यतिरिक्त पदेच अस्तित्वात राहतील आणि हे पदाधिकारी समितीचे दैनंदिन कामकाज पाहतील समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख, सचिव कृष्णा जाधव आणि खजिनदार प्रमोद पार्टे यांनी हे प्रसिद्धी पत्रक जारी केले आहे. सर्व सदस्यांना समितीच्या शिस्त आणि धोरणांचा आदर राखून या निर्णयांचे तात्काळ पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.






