मालाड पूर्ववासीयांची गैरसोय कायम: ‘पी/पूर्व’ मनपा कार्यालय केवळ नावापुरते!
तात्काळ पूर्णवेळ अधिकारी नेमा; 'साद-प्रतिसाद' संस्थेची मनपाकडे मागणी

संदिप सावंत
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेचा (BMC) २५ वा प्रशासकीय विभाग म्हणून मोठ्या गाजावाजासह ऑक्टोबर २०२३ मध्ये सुरू करण्यात आलेले ‘पी/पूर्व’ (P/East) विभाग कार्यालय आज, जवळपास दोन वर्षांनंतरही पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झालेले नाही. या विभागाच्या हद्दीतील मालाड पूर्व, दिंडोशी आणि कुरार परिसरातील सुमारे ७ लाख नागरिकांची गैरसोय अजूनही कायम आहे. त्यांना अत्यावश्यक कामांसाठी मालाड पश्चिमेकडील मूळ कार्यालयात धावपळ करावी लागत आहे. विशेष म्हणजे, या कार्यालयात सध्या केवळ ग्राहक सेवा केंद्र सुरू असून, तेथे फक्त बिलांची स्वीकृती आणि प्रिंट दिल्या जातात. प्रशासकीय आवक-जावक किंवा इतर महत्त्वाची कामे होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. ‘साद-प्रतिसाद संस्था’ या सामाजिक संस्थेने मनपा प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारावर टीका करत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
’पी/पूर्व’ कार्यक्षेत्रात येणारा परिसर
’पी/पूर्व’ विभाग हा पूर्वीच्या ‘पी/उत्तर’ विभागातून विभाजन करून तयार करण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने मालाड पूर्व, दिंडोशी, कुरार, संतोषनगर, आप्पापडा, खडकपाडा, फिल्टरपाडा या भागांचा समावेश होतो. या विभागाची पूर्व मर्यादा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानापर्यंत, तर पश्चिम मर्यादा रेल्वे ट्रॅक आणि हाजी बापू रोडपर्यंत आहे. उत्तरेला आकुर्ली रोड आणि दक्षिणेला गोरेगाव मुलुंड लिंक रोडपर्यंत या विभागाची हद्द विस्तारलेली आहे. येथील आयटी पार्क आणि मोठे डायमंड मार्केट हे या विभागाचे वैशिष्ट्य आहे.
सध्याची प्रशासकीय स्थिती
कार्यालयाचे लोकार्पण झाले असले तरी येथील प्रशासकीय यंत्रणा कोलमडलेली आहे. विभागाचे प्रमुख सहाय्यक आयुक्त आणि बहुतांश महत्त्वाचे विभागांचे अधिकारी आजही ‘पी/उत्तर’ (आता ‘पी/पश्चिम’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या) विभागाच्या पश्चिमेकडील कार्यालयातूनच कामकाज चालवतात. ‘पी/पूर्व’ कार्यालयाला आजपर्यंत पूर्णवेळ अधिकारी मिळालेले नाहीत.|
अपूर्ण सेवा: ‘पी/पूर्व’ कार्यालयात सध्या केवळ पाणी पुरवठा आणि घनकचरा व्यवस्थापन यांसारख्या विभागांचे काही अधिकारी ठरलेल्या वेळेत उपस्थित राहतात. केवळ ग्राहक सेवा केंद्र: कार्यालयात फक्त बिल भरणा आणि प्रिंटिंगची सुविधा असलेले ग्राहक सेवा केंद्र सुरू आहे. याव्यतिरिक्त कोणतीही प्रशासकीय कामे येथे होत नाहीत.
आवक-जावक समस्या: कार्यालयाची सर्व प्रशासकीय आवक-जावक आणि महत्त्वाचा पत्रव्यवहार अजूनही पश्चिमेकडील कार्यालयातच होतो.
गैरसोयीचा कळस: नागरिकांसाठी अत्यंत आवश्यक असलेली जन्म, मृत्यू आणि विवाह नोंदणी येथे सुरू आहे, परंतु या नोंदणीनंतरच्या सर्व प्रशासकीय कामांसाठी नागरिकांना मालाड (पश्चिम) येथील कार्यालयात जाणे भाग पडते.’साद-प्रतिसाद’ संस्थेची मनपा आयुक्तांना मागणी
’साद-प्रतिसाद’ संस्थेने या स्थितीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. संस्थेच्या सदस्यांनी सांगितले की, “मालाड पूर्ववासीयांना त्यांच्या स्थानिक समस्यांसाठी दूरच्या कार्यालयात जावे लागू नये, म्हणून हे कार्यालय उघडले. पण उद्घाटनाची औपचारिकता पूर्ण झाल्यानंतरही जर नागरिक त्याच गैरसोयींचा सामना करत असतील, तर मनपाने जनतेच्या वेळेचा आणि पैशाचा विचार करावा.”
संस्थेने मनपा आयुक्तांना तातडीने खालील मागण्या पूर्ण करण्याची विनंती केली आहे:
१. पूर्णवेळ अधिकारी नियुक्ती: ‘पी/पूर्व’ विभागासाठी तातडीने पूर्णवेळ सहाय्यक आयुक्त आणि सर्व महत्त्वाच्या विभागांचे (जसे की मालमत्ता कर, बांधकाम, परवाना) पूर्णवेळ अधिकारी नियुक्त करावेत.
२. सेवांचे हस्तांतरण: जन्म-मृत्यू-विवाह नोंदणीसह मालमत्ता कर, पाणी बिल, परवाना आणि बांधकाम परवानग्या यांसारख्या सर्व सेवा पूर्णपणे ‘पी/पूर्व’ कार्यालयात त्वरित हस्तांतरित कराव्यात.
३. स्वतंत्र आवक-जावक विभाग: प्रशासकीय पत्रव्यवहारासाठी ‘पी/पूर्व’ कार्यालयात त्वरित आणि स्वतंत्र आवक-जावक (Despatch) विभाग सुरू करावा.






