मुंबई मनपा ‘पी पूर्व’ विभागातील नागरिकांची कुचंबणा! जन्म-मृत्यू-विवाह नोंदणीसाठी ‘पी उत्तर’ विभागाचे हेलपाटे

संदिप सावंत
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) ‘पी पूर्व’ विभागातील (मालाड पूर्व) रहिवाशांना जन्म, मृत्यू आणि विवाह नोंदणीच्या कामासाठी प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. विभागात केवळ एकच कर्मचारी कार्यरत असल्याने तसेच प्रक्रियेसाठी ‘पी उत्तर’ (मालाड पश्चिम) विभागाच्या कार्यालयात जावे लागत असल्याने नागरिकांना नाहक हेलपाटे मारावे लागत आहेत. विशेष म्हणजे, पूर्वी ‘पी उत्तर’ विभागाचे दोन तुकडे करूनच ‘पी पूर्व’ विभाग तयार करण्यात आला होता, तरीही महत्त्वाचे सर्व पत्रव्यवहार आजही ‘पी उत्तर’ कार्यालयातच घेतले जातात. या समस्येमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
एक कर्मचारी, दुहेरी कार्यालयाचा ताण
’पी पूर्व’ विभागात जन्म, मृत्यू आणि विवाह नोंदणीसाठी केवळ अर्ज स्वीकारले जातात. परंतु, त्यानंतरची संपूर्ण प्रक्रिया मालाड पश्चिम येथील मनपा ‘पी उत्तर’ कार्यालयात पार पाडली जाते. आरोग्य विभागाचे अधिकारी आणि संबंधित कर्मचारी देखील याच ‘पी उत्तर’ कार्यालयात कार्यरत असल्याने नागरिकांना प्रत्येक कामासाठी लांबचा प्रवास करून ‘पी उत्तर’ कार्यालयात धाव घ्यावी लागते. ‘पी पूर्व’ विभागाच्या रामलीला मैदान येथील कार्यालयात गेले असता त्यांना ‘पी उत्तर’ कार्यालयात संपर्क साधण्यास सांगितले जाते. विवाह दाखल्यांचे अर्ज महिनाभर पडून विशेषतः विवाह दाखल्यांबाबत ही समस्या अधिक गंभीर आहे. ‘पी पूर्व’ विभागात विवाह दाखल्यांचे अर्ज महिना महिनाभर पडून राहत असल्याचे समोर आले आहे. यामुळे नागरिकांच्या कामात मोठा विलंब होत आहे. एकाच कामासाठी दोन वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये जावे लागणे, कर्मचाऱ्यांची कमतरता आणि वेळेत काम न होणे यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात कुचंबणा होत आहे.
’साद प्रतिसाद संस्थे’ची मागणी
या गंभीर परिस्थितीची दखल घेत ‘साद प्रतिसाद संस्थे’ने मनपा प्रशासनाकडे तातडीने मागणी केली आहे. ‘पी पूर्व’ विभागात संबंधित कामांसाठी पुरेसा कर्मचारी वर्ग उपलब्ध करून देण्यात यावा, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. तसेच, जन्म, मृत्यू आणि विवाह नोंदणीची संपूर्ण प्रक्रिया ‘पी पूर्व’ विभागातच पूर्ण करावी, जेणेकरून मालाड पश्चिमेकडील ‘पी उत्तर’ कार्यालयात जाण्याची नागरिकांची धावपळ व दगदग थांबेल. मनपा प्रशासनाने या समस्येची गांभीर्याने नोंद घेऊन तातडीने आवश्यक मनुष्यबळ पुरवावे आणि नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी अपेक्षा ‘पी पूर्व’ विभागातील नागरिक व्यक्त करत आहेत.






