मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्र ‘खासदार कला क्रीडा महोत्सव-२०२५’ चे १६ नोव्हेंबरला भव्य उद्घाटन…
-शहाजी राजे भोसले क्रीडा संकुल येथे पार पडणार उद्घाटन सोहळा -महोत्सवात एकूण १५ क्रीडा स्पर्धांचा समावेश - नोव्हेंबर ते २५ डिसेंबर या कालावधीत पार पडणार स्पर्धा - विजेत्यांना आकर्षक बक्षिसे, ट्रॉफी, प्रशस्तीपत्रक व भेटवस्तू - स्पर्धा प्रवेश फक्त मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्रातील जनतेसाठी

मुंबई : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुचनेनुसार मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्रामध्ये भव्य ‘खासदार कला क्रीडा महोत्सव-२०२५’ चे खासदार रविंद्र वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन १६ नोव्हेंबर २०२५ रोजी अंधेरी पश्चिम येथील शहाजी राजे भोसले क्रीडा संकुल येथे पार पडणार आहे. या महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी विविध मान्यवर उपस्थित राहणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत १० नोव्हेंबर २०२५ आहे.
भारताला खेळामध्ये अग्रस्थानी नेण्याच्या स्वप्नांनाना बळ देण्यासाठी पंतप्रधान यांनी देशातील खासदार यांना अशाप्रकारे महोत्सव आयोजित करण्याच्या सूचना दिल्या होत्या. अशा प्रकारचे महोत्सवामुळे शहरी बरोबरच ग्रामीण भागातील खेळाडूना संधी प्राप्त होणार आहे. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्रात आयोजित या महोत्सवात कॅरम, बुद्धिबळ, खो खो, कबड्डी, फुटबॉल, कुस्ती, स्वमिंग, बॅटमिटन, बॉक्सिंग, मॅरेथॉन , क्रिकेट, लॉंग टेनिस, योगा, पिकल बॉल, जिमन्यास्टिक, अशा एकण १५ स्पर्धांचा समावेश करण्यात आला आहे. १६ नोव्हेंबर ते २५ डिसेंबर २०२५ रोजी या कालवधीत हा महोत्सव पार पडणार आहे. यातील काही स्पर्धा मातोश्री क्रीडा संकुल, अंधेरी (पूर्व), पूनम नगर येथील शिवाई मैदान, अंधेरी (पूर्व), शहाजी राजे भोसले क्रीडा संकुल, अंधेरी (पश्चिम), नंदादीप विद्यालय, गोरेगाव (पूर्व) येथे पार पडणार आहे. तसेच मॅरेथॉन स्पर्धा ही आरे कॉलोनी येथे आयोजित करण्यात आली आहे. या महोत्सवातील विविध स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी नाव नोंदणीसाठी ravindrawaikar.com या वेबसाईट वापर करण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
या महोत्सवातील विविध स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे, मेडल, ट्रॉफी, प्रशस्तीपत्रक व भेटवस्तू देण्यात येणार आहे. या महोत्सवात मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्रातील रहिवाशीच सहभागी होऊ शकतात.






