सत्ता असो, नसो ; टीआरपी ठाकरे बंधूंकडेच !

मुंबई: १९ जून १९६६ रोजी मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी बाळ केशव ठाकरे उर्फ बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. या शिवसेनेचे हीरक महोत्सवी वर्ष आहे. या साठ वर्षांत शिवसेनेने अनेक उन्हाळे, हिवाळे, पावसाळे पाहिले. अनेक चढ उतार पाहिले. अनेक संकटे पचविली, अनेकदा महाराष्ट्राच्या हितासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष केला, आंदोलने केली. अनेक जण सोडून गेले. नवनवीन अनेक जण मातोश्रीवर मुजरा करायला आले. १९९५ साली राज्यात, केंद्रात सत्तेत शिवसेना सहभागी झाली. अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांच्या पासून तर नरेंद्र दामोदरदास मोदी, देवेंद्र गंगाधरराव फडणवीस यांना सत्तेसाठी ‘हात’ दिला. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अनेक ठिकाणी शिवसेनेने सत्ता काबीज केली. शिवसेनेच्या खांद्यावर उभे राहून भारतीय जनता पक्ष गगनाला गवसणी घालता झाला. पण हे करतांना ज्या खांद्याने आपल्याला मोठे केले त्यांनाच खांदा देण्याचे षडयंत्र रचण्यात आले. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे महानिर्वाण झाले. परंतु त्यानंतरही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आपले नेतृत्व सिद्ध केले. शिवसेनेच्या इतिहासात बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक दगडांना शेंदूर फासले, हे दगड स्वतःलाच देव मानायला लागले. अनेक नाक्यावरच्या तरुणांना शिवसेनेत आणून मोठमोठी पदे दिली परंतु तेच एहसान फरामोश निघाले. याच दरम्यान स्वरराज श्रीकांत ठाकरे उर्फ राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या समवेत मतभेद झाले म्हणून शिवसेनेशी काडीमोड घेत स्वतःचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष स्थापन केला. ठाकरे ब्रॅण्ड असल्याने त्यांना लोकांनी उचलून धरले. रमेश किणी प्रकरणावरुन जे ज्येष्ठ पत्रकार राज ठाकरे यांना तुरुंगात घालण्यासाठी देव पाण्यात घालून बसले होते तेच ज्येष्ठ पत्रकार राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर निघून महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन करते होताच आणि त्यांच्या दादरच्या शिवतीर्थावरील सभेला प्रचंड प्रतिसाद मिळताच “तोच आवेश, तोच आवाज, तीच गर्दी, तेच वक्तृत्व” अशा शब्दांत तोंड फाटेस्तोवर स्तुतीसुमने उधळतांना जनतेने पाहिले आहे. १३ ऑगस्ट १९६० रोजी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांनी मार्मिक हे जागतिक पातळीवरील पहिले मराठी व्यंगचित्र साप्ताहिक सुरु करुन झोपलेल्या मराठी माणसाला खडबडून जागे केले. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव बळवंतराव चव्हाण यांच्या शुभहस्ते या ‘मार्मिक’चे प्रकाशन करण्यात आले. त्यावेळेपासून बाळासाहेब ठाकरे आणि श्रीकांत ठाकरे हे संपादक आणि सहसंपादक म्हणून मार्मिक मध्ये कार्यरत होते. आजही बाळासाहेब ठाकरे आणि श्रीकांत ठाकरे यांची नांवे मार्मिक मध्ये प्रसिद्ध होत आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचे रमेश ठाकरे हे आणखी एक बंधू होते. परंतु ते स्वतंत्र रहात होते. आरोळी नांवाचे त्यांचे साप्ताहिक होते. तीनही बंधू अर्थात ठाकरे सर्वच कलाकार, व्यंगचित्रकार, छायाचित्रकार. सारेच दूरदृष्टी आणि कल्पक विचार करीत विकासाचा आराखडा तयार करण्यात वाकबगार. राज ठाकरे यांनी शिवसेनेतून २००६ साली बाहेर पडून महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली. तेंव्हा पासून मतभेदांची, टीकेची राळ उडत होती. शिवसेनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र आली असती तर मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे आणि उपमुख्यमंत्रीपद महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हातात आले असते. परंतु नियतीला हे मंजूर नसावे. राजकीय उलथापालथ झाली. पक्ष फोडून सत्ता हस्तगत करण्याच्या खेळी झाल्या. आणि त्रिभाषा सूत्रीने डोकं वर काढलं. हिंदी सक्तीचा मुद्दा पुढे आला. मराठीवर अन्याय होऊन हिंदी बोडक्यावर बसू नये म्हणून भारतीय जनता पक्ष आणि मित्रपक्ष वगळता सर्व राजकीय पक्ष एकवटले. उद्धव आणि राज ठाकरे बंधूंनी हातात हात घेत मोर्चा काढण्याची घोषणा करताच हिंदी सक्तीचा शासन निर्णय मागे घेण्यात आला. मग मोर्चाचे रूपांतर विराट मेळाव्यात झाले. अवघ्या मराठी जनतेच्या डोळ्याचे पारणे फिटले. मराठी माणूस आनंदला. उभा महाराष्ट्र आनंदविभोर झाला. त्या ५ जुलै २०२५ पासून ठाकरे बंधू अनेकदा एकत्र येऊन भेटू लागले, चर्चा करु लागले, कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होऊ लागले. मातोश्री ते शिवतीर्थ हे अंतर कमी होत होत जवळ जवळ आले. गणपतीच्या दर्शनाला मातोश्री शिवतीर्थावर आली. तर शिवतीर्थ मातोश्री जवळ आले. ‘राज’माता मधुवंती श्रीकांत ठाकरे यांच्या भेटीसाठी भाचा/पुतण्या उद्धव आणि परिवार शिवतीर्थावर डेरेदाखल झाला. भाऊबीजेसाठी ‘राज’भगिनी जयजयवंती ठाकरे देशपांडे यांच्या दादरच्या निवासस्थानी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे आपापल्या कुटुंबियांसमवेत आले आणि देवदुर्लभ सोहोळा झाला. आजच्या घडीला ना उद्धव ठाकरे सत्तेत, ना राज ठाकरे सत्तेत पण माध्यमांमध्ये आजच्या परिभाषेत टीआरपी ठाकरे बंधूंकडेच असल्याचे /वाढल्याचे दिसून येत आहे. बाळासाहेब ठाकरे, श्रीकांत ठाकरे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, आदित्य ठाकरे, अमित ठाकरे, तेजस ठाकरे या ठाकरे बंधूंभोवतीच टीआरपी फिरतोय. बाळासाहेब ठाकरे आणि श्रीकांतजींच्या काळात वृत्तवाहिन्यांचा सुळसुळाट नव्हता पण आज उद्धव आणि राज, आदित्य आणि अमित या ठाकरे बंधूंना माध्यमांनी अक्षरशः घेरल्याचे दिसून येते. अरे, या बंधूंना त्यांचे व्यक्तीगत आयुष्य नावाची गोष्ट आहे की नाही ? प्रत्येक वेळी कॅमेरा त्यांच्याच भोवती. एकदा राज ठाकरे प्रसाधनगृहाकडे निघाले असतांना छायाचित्रकार अवतीभवती होते तेंव्हा, “अरे, इथे तरी मला एकट्याला सोडा. की तिथे पण येताय ?” अशा आपल्या खास ठाकरी शैलीत त्यांनी सुनावल्याचे कळते. माध्यमांनी जरा तारतम्य बाळगावे असे वाटते. ब्रेकिंग न्यूजच्या धबडग्यात आपण काय करतो आहोत, हेच कळेनासे झाले आहे. एक मात्र नक्की की आज सत्तेवर असो की नसो टीआरपी हा ठाकरे बंधूंकडेच असल्याचे सिद्ध झाले आहे. ही ठाकरे बंधूंची घोडदौड सर्वत्र निखळ, शुद्ध भगवा फडकविल्याशिवाय राहणार नाही हे निःसंशय ! जय महाराष्ट्र !

-योगेश वसंत त्रिवेदी, ९८९२९३५३२१. (लेखक हे ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आहेत.)




