महाराष्ट्र

मराठा,आकाशवाणी ते सकाळ ; सहा दशकांची वसंतराव देशपांडे यांची वैभवशाली पत्रकारिता !

 मुंबई : वसंतराव देशपांडे उर्फ दादा देशपांडे. आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या मराठा मधून मराठी पत्रकारिता प्रारंभ करणारे दादा देशपांडे मराठा मधून आकाशवाणी मध्ये आले आणि तेथून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्यानंतर नानासाहेब परुळेकर यांनी स्थापन केलेल्या सकाळ दैनिकात रुजू झाले. सुमारे सहा दशकांची दैदिप्यमान आणि वैभवशाली पत्रकारिता केलेल्या वसंतराव दादा देशपांडे हे वयाची ९२ वर्षे पूर्ण करुन ९३ व्या वर्षांत पदार्पण करीत आहेत. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांनी १३ ऑगस्ट १९६० रोजी मराठी माणसाला जागृत करण्यासाठी सुरु केलेल्या जगातील पहिल्या मराठी व्यंगचित्र साप्ताहिक मार्मिक ला बरोब्बर ६५ वर्षे पूर्ण झाली. आज वयाच्या ९३ व्या वर्षाच्या उंबरठ्यावर उभे असलेले ज्येष्ठ राजकीय विश्लेषक वसंत वासुदेव देशपांडे उर्फ वसंतराव दादा देशपांडे यांनी या संदर्भातील जुन्या आठवणींना उजाळा दिला. मार्मिक चे संपादक माजी मुख्यमंत्री आणि ख्यातनाम छायाचित्रकार उद्धव बाळासाहेब ठाकरे, कार्यकारी संपादक  मुकेश माचकर आणि मार्मिक परिवाराचे अभिनंदन करुन दादांनी भावी वाटचालीसाठी मार्मिक परिवाराला शुभेच्छा दिल्या. दादा म्हणाले, “अरे योगेश, आज मला तो दिवस आठवतोय. १ नोव्हेंबर १९५६ रोजी मी आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या दैनिक मराठा मध्ये पत्रकार म्हणून काम सुरु केले. आणि आकाशवाणी मध्ये मराठी पत्रकार हवे असल्याचे कळल्यावरुन मी ९ ऑगस्ट १९६० रोजी मराठाचा राजीनामा दिला. १० ऑगस्ट १९६० रोजी आकाशवाणी मध्ये पत्रकार म्हणून रुजू झालो. यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री होते आणि विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होते. इतक्यात आंतरराष्ट्रीय कीर्तीचे व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांच्या संपादकत्वाखाली जागतिक पातळीवरचे पहिले मराठी व्यंगचित्र साप्ताहिक मार्मिक सुरु होणार असल्याची माहिती मिळाली. १३ ऑगस्ट १९६० रोजी बालमोहन विद्यामंदिर, दादर येथे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या शुभहस्ते मार्मिक च्या पहिल्या अंकाचे प्रकाशन करण्यात आले. योगायोगाने आकाशवाणी साठी या कार्यक्रमाचे वृत्तांकन करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात आली. त्यामुळे या एका ऐतिहासिक घटनेचा मी साक्षीदार ठरु शकलो. ‘मार्मिक’ च्या गेल्या पासष्ट वर्षांच्या वाटचालीचाही किंबहुना ‘मार्मिक’, ‘शिवसेना’ आणि ‘सामना’ या हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या महत्वपूर्ण ‘त्रिशूळ’च्या वैभवशाली वाटचालीचा मी नजीकचा साक्षीदार होणे हे माझ्या दृष्टीने भाग्याचेच म्हणावे लागेल.” दादांनी भरभरून बोलत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. पत्रकारितेतील भीष्माचार्य वसंतराव दादा देशपांडे आणि स्वातंत्र्यसैनिक जेठालाल शाह हे दोघे आज ९२ वर्षांचे असून जेठालाल शाह हे स्वातंत्र्य लढ्यातही सहभागी झाले होते. अहमदनगर येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी ज्या मैदानावर “स्वराज हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि ते मी मिळविणारच !” अशी ब्रिटिशांना ठणकावून सांगणारी घोषणा केली होती त्या इमारत बिल्डिंग गल्लीजवळच्या ऐतिहासिक मैदानावर भरणाऱ्या राष्ट्र सेवा दलाच्या शाखांमध्ये रावसाहेब पटवर्धन आणि अच्युतराव पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य केले. त्यानंतर दादा देशपांडे आणि जेठालाल शाह हे दोघे चित्रा मध्ये पत्रकार म्हणून काम करु लागले. दोघेही पदवीधर असल्यामुळे सचिवालयात माहिती व जनसंपर्क महासंचालनालय येथे जेठालाल शाह यांनी अर्ज केला तर दादा देशपांडे आचार्य अत्रे यांच्या मराठामध्ये लागले. मार्मिक च्या ६५ व्या वर्धापन दिनानिमित्त दादा देशपांडे यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. १ मे १९६० पासून सुमारे सहा दशके वसंतराव देशपांडे यांनी राजकीय पत्रकारिता करतांना संसदीय लोकशाही आणि तदनुषंगिक असंख्य घडामोडी यांचे ते केवळ साक्षीदार नव्हे तर विधिमंडळातर्फे प्रकाशित अनेक ग्रंथांसाठी महत्वपूर्ण योगदान दादांनी दिले आहे. मुंबई द्विभाषिक राज्याचे मुख्यमंत्री यशवंतराव बळवंतराव चव्हाण हे संयुक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून १९६२ पर्यंत राहिले. तत्पूर्वी मोरारजी देसाई हे मुंबई द्विभाषिक राज्याचे मुख्यमंत्री होते. म्हणजे १९५६ सालापासून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पर्यंत सर्वांची राजवट पत्रकार म्हणून जवळून पाहण्याचे भाग्य ज्यांना लाभले आणि अजूनही जे कार्यरत आहेत असे वसंत वासुदेव देशपांडे अर्थात वसंतराव दादा देशपांडे. काय योगायोग आहे पहा वसंतराव बंडुजी पाटील हे सांगलीचे आणि वसंतराव देशपांडे हेही सांगलीचे. दोन्ही वसंतरावांना ‘दादा’ म्हणून ओळखण्यात येते. दादांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचे वृत्तांकन केले असल्याने त्यांना ‘मराठा’ या पत्रकारितेतील तळपत्या तलवारीसह काम करण्याचे भाग्य लाभले. प्रल्हाद केशव अत्रे म्हणजेच आचार्य अत्रे यांचे खऱ्या अर्थाने मार्गदर्शन दादांना लाभले. त्यायोगे त्यांना प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, आचार्य अत्रे, भाई श्रीपाद अमृत डांगे, सेनापती बापट, श्रीधर महादेव म्हणजेच एसेम जोशी आदि लढाऊ नेत्यांच्या सहवासात वावरता आले. मराठा नंतर भारत सरकारच्या अधिपत्याखाली आकाशवाणीचे प्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी मिळाली.

या ठिकाणी सेवानिवृत्त होईपर्यंत दादांनी महाराष्ट्रातील महत्वाच्या घटनांचा साक्षीदार म्हणून आपल्या आठवणींच्या शिदोरीत जबरदस्त अनुभव जमविला. संयुक्त महाराष्ट्राचा सुवर्णमहोत्सव असो की हिरक महोत्सव दादांना सगळा इतिहास खडानखडा तोंडपाठ आहे. याच इतिहासावर दादांनी ‘महाराष्ट्राची सुवर्णगाथा’ हे पुस्तक लिहिले. ग्रंथाली या ख्यातनाम प्रकाशन संस्थेने दादांचे हे जणू आत्मकथन असलेले पुस्तक संयुक्त महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवी वर्षांत म्हणजे २८ फेब्रुवारी २०११ रोजी प्रसिद्ध केले. या पुस्तकाची पुरवणी आवृत्ती सुद्धा प्रकाशित करण्यात आली. दादांनी ‘सहा दशकांची पत्रकारिता’ हे अनुभवकथन लिहिले आहे आणि ज्याचा राजकीय, पत्रकारिता करणाऱ्या सर्वांनी आवर्जून अभ्यास केला पाहिजे. या ‘सहा दशकांची पत्रकारिता’ या पुस्तकाचा परिचय ज्येष्ठ पत्रकार आणि दादांचे जवळचे मित्र दिलीप चावरे यांनी करुन दिला आहे. दुर्दैवाने कोरोना या जागतिक महामारीच्या काळात दादांचे हे वाङ्मय लोकांना उपलब्ध होऊ शकले नाही. परंतु आता याचा उपयोग करुन घेता येऊ शकतो. वसंतराव दादा देशपांडे यांनी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघात महत्त्वाची भूमिका निभावली आहे. व्ही. टी. (शामराव) देशपांडे, पी. के. नाईक, व्ही. के. नाईक, बाळ देशपांडे, राजा केळकर, यशवंत उर्फ आबा मुळ्ये, विनायक तिवारी, व्ही. पी. माळी, मधुकर भावे, मनोहर पिंगळे, कृ. पां. सामक, विजय वैद्य, मनुभाई जोशी, हरीन देसाई, रावसाहेब गजिनकर, नारायणराव हरळीकर, दिलीप चावरे, कुमार कदम, देवदास मटाले, सिद्धार्थ आर्य, अनिकेत जोशी, प्रफुल्ल सागळे, यशवंत (नाना) मोने, यशवंत (अण्णा) पिंपळीकर, भारतकुमार राऊत, दिनकर रायकर, प्रकाश कुळकर्णी, डॉ. सुकृत खांडेकर, प्रताप थोरात, सतीश खांबेटे, प्रमोद पागेदार, राजू वेर्णेकर, वैजयंती कुळकर्णी, अजय वैद्य, प्रभाकर राणे, अनंत मोरे, विलास मुकादम, अरविंद भानुशाली, कमलाकर वाणी अशा अनेक जुन्या नव्या पत्रकारांना सोबत घेऊन दादा मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघात कार्य केले आहे. वार्ताहर संघाची घडी बसविण्यासाठी दादांनी मेहनत घेतली. मग त्यासाठी घटना तयार करणे, घटना दुरुस्ती, नियमावली, विविध प्रकारच्या योजना आखून त्या मार्गी लावणे, संघाचे पुरस्कार देण्यासाठी निवड समिती बनविणे, समितीच्या माध्यमातून मार्गदर्शन करणे या जबाबदाऱ्या दादांनी यथायोग्य पद्धतीने पार पाडल्या. या बरोबरच दादांचे मार्गदर्शन विधानमंडळ सचिवालयानेही विविध प्रसंगी घेतले आहे. वेगवेगळ्या नेत्यांच्या भाषणांची पुस्तके प्रसिद्ध करण्यासाठी ज्या समित्या विधानमंडळातील वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र यांच्या विद्यमाने बनविल्या त्यात दादांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. १९५७ च्या विधानसभा निवडणुकीपासून आतापर्यंतच्या निवडणुका, त्यातील महत्वाच्या घडामोडी, ठळक वैशिष्ट्ये, यासाठी लागणाऱ्या प्रवेश पत्रिका, विधिमंडळ अधिवेशनात आवश्यक असणाऱ्या प्रवेश पत्रिका यांचे १९५७ सालापासून आतापर्यंत दादांनी जतन करुन ठेवले आहे. पत्रकार कसा असावा याचा आदर्श दादांनी वृत्तपत्रसृष्टीसमोर ठेवला आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे बुजूर्ग नेते रमाकांत गणेश कर्णिक (र. ग.) यांच्या प्रमाणेच यशवंतराव चव्हाण ते उद्धव ठाकरे यांच्या पर्यंत सर्वच मुख्यमंत्र्यांच्या राजवटीचे साक्षीदार वसंतराव (दादा) देशपांडे ठरले आहेत. मराठा, नवयुग, आकाशवाणी, सकाळ अशी सहा दशकांची पत्रकारिता करणारे दादा देशपांडे म्हणजे माहितीचा अभूतपूर्व खजीना आहेत. मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण आणि मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे यांनी हा खजीना जतन करण्यासाठी दादांना सोबत घेऊन योग्य ती पावले उचलणे आवश्यक आहे. मराठी पत्रकारितेला हा मोठा ऐतिहासिक आणि अभूतपूर्व असा दस्तावेज उपलब्ध होऊ शकेल. १० नोव्हेंबर रोजी दादा आपल्या वयाची ९२ वर्षे पूर्ण करुन ९३ व्या वर्षांत पदार्पण करीत आहेत. २ एप्रिल २०२१ रोजी दादांच्या सहधर्मचारिणी सौ. शुभदा यांना कोरोना या जागतिक महामारीने आपल्यातून हिरावून नेले. मूळच्या नंदुरबार येथील सौ. देशपांडे यांनी दादांच्या संसारात ऊन, पाऊस, वारा याची, विविध संकटांची तमा न बाळगता दादांना अविरतपणे साथ दिली. पत्नीच्या निधनानंतर आता दादांनी स्वतःला सावरुन येईल त्या परिस्थितीत भक्कमपणे उभे राहण्याचा प्रयत्न केला आहे. योगायोगाने दादांचे सुपूत्र मिलिंद यांचाही वाढदिवस १० नोव्हेंबर हाच आहे. मिलिंद आणि परिवार दादांना अक्षरशः फुलासारखे जपण्याचा प्रयत्न करीत आहे. आपणही मिलिंद सह दादांना उदंड आयुष्य आणि ठणठणीत आरोग्य मिळण्यासाठी ईश्वराकडे प्रार्थना करु या. यात खरे म्हणजे स्वार्थात परमार्थ आहे. कारण दादांचे मार्गदर्शन घेता घेता त्यांच्या कडे असलेला माहितीचा खजिना समाजासाठी आपल्याला उपलब्ध करुन घ्यायचा आहे. मला सुमारे ४० वर्षांपूर्वी आकाशवाणीवर पहिले भाषण करण्याची संधी वसंतराव (दादा) देशपांडे यांनी उपलब्ध करुन दिली आणि त्यानंतरच खऱ्या अर्थाने माझ्यासाठी आकाशवाणी, दूरदर्शन, विविध वाहिन्यांचे दालन उघडले. दादांबद्दल ग्रंथ सुद्धा कमी पडतील. परंतु दादांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे हे मी माझे कर्तव्य समजतो. दादा, पुनश्च आपल्याला उदंड आयुष्य आणि ठणठणीत आरोग्य प्राप्त होवो, ही आपल्या कुलदैवताकडे विनम्र प्रार्थना !

-योगेश वसंत त्रिवेदी, 9892935321. (लेखक ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आहेत).

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!