मुंबईकरांना उद्या सोमवार ते बुधवार लसीकरणा साठी थेट केंद्रावर जाण्याची मुभा

गुरूवार दि. २७ ते २९ मे रोजी ऑनलाईन नोंदणी करूनच लसीकरण

मुंबई,दि.२३: कोविड-१९ प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत मुंबईकरांचे लसीकरण सुरळीत होण्यासाठी तसेच लसीकरण केंद्रावरील मनुष्यबळ, लसीच्या मात्रा याचा पुरेपूर व सुयोग्य वापर होण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने आज सुधारित मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्या नुसार उद्या सोमवार, दिनांक २४ मे २०२१ ते बुधवार, दिनांक २६ मे २०२१ असे ३ दिवस लसीकरणासाठी केंद्रांवर थेट येण्याची (वॉक इन) मुभा असणार आहे.

कोणती लस घेण्यासाठी कुणी जावे ?

कोविशिल्ड लसीसाठी –
• ६० वर्ष व ६० वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील कोविशील्ड लसीच्या पहिल्या मात्रेचे लाभार्थी जाऊ शकतात.

• ६० वर्ष ६० वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील कोविशिल्ड लसीच्या दुसऱ्या मात्रेसाठी पात्र लाभार्थी जाऊ शकतात.

• आरोग्य कर्मचारी व आघाडीवरील (फ्रंटलाईन) इतर कर्मचारी यांच्यातील दुसऱ्या मात्रेचे पात्र लाभार्थी जाऊ शकतात.

• ४५ वर्ष व त्यावरील वयोगटातील दुसऱ्या मात्रेचे पात्र लाभार्थी लस घेण्यासाठी जाऊ शकतात.

त्यासोबत, कोव्हॅसीन लसीचा विचार करता, सर्व वयोगटातील, दुसऱ्या मात्रेसाठी पात्र लाभार्थी येवू शकतील.

दिनांक २७ मे २०२१ ते दिनांक २९ मे २०२१ असे तीन दिवस प्रत्येक केंद्रावर १००% लसीकरण हे कोविन प्रणालीवर नोंदणी केल्यानंतर तसेच लसीकरण केंद्र व वेळ निश्चित झाल्यानंतरच (स्लॉट बुकींग) करण्यात येईल.

रविवार, दिनांक ३० मे २०२१ रोजी लसीकरण कार्यक्रम बंद राहील

आठवड्यातील लसीकरणाच्या सदर नियोजनामध्ये अनपेक्षित कारणांनी काही बदल करावा लागल्यास त्याबाबतची पूर्वसूचना एक दिवस आधी प्रसारमाध्यमं आणि समाज माध्यमं ह्यांच्या माध्यमातून मुंबईकरांपर्यंत पोहोचविण्यात येईल असे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने अलिकडे केलेल्या सुचनेनुसार, कोविशील्ड लसीच्या पहिल्या व दुसऱ्या मात्रांमध्ये पूर्वीच्या ६ ते ८ आठवड्यांऐवजी आता किमान १२ ते १६ आठवड्याचे अंतर असणे आवश्यक आहे. म्हणजेच कोविशील्ड लसीच्या पहिल्या मात्रेनंतर ८४ दिवसांचे अंतर राखून दुसरी मात्रा दिली जाईल.

ही बाब लक्षात घेता, दिनांक १ मार्च २०२१ पासून कार्यान्वित झालेल्या लसीकरण टप्प्यातील ६० वर्ष व ६० वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांनी तसेच आरोग्य कर्मचारी व आघाडीवर काम करणारे इतर कर्मचारी यांनी दिनांक १ मार्च २०२१ रोजी कोविशील्ड लसीची पहिली मात्रा घेतली असल्यास, त्यांना दिनांक २४ मे २०२१ अथवा ८४ दिवसांनंतर दुसरी मात्रा देण्यात येणार आहे.

कोविड – १९ प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या नियोजनाची योग्य अंमलबजावणी व्हावी, यासाठी मुंबईकर नागरिकांनी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!