महाराष्ट्र

“AI तंत्रज्ञानावर आधारित अद्यावत टोल नाका सुरू करा!”—परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : मुंबईच्या उत्तरेकडील प्रवेशद्वारावर होणाऱ्या वाहतूक कोंडीचा आणि वायू प्रदूषणाचा त्रास संपविण्यासाठी दहिसर टोलनाक्याऐवजी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून टोल भरणा प्रक्रिया वेगवान करण्याचा नवा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले .

मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला सहाय्यक पोलीस आयुक्त अनिल कुंभारे (बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालय), भारतीय राष्ट्रीय महामार्ग, दत्ता शिंदे (अतिरिक्त पोलिस आयुक्त मिरा -भाईंदर), प्राधिकरणाचे संचालक अंन्शुमली श्रीवास्तव, प्रकल्प संचालक सुहास चिटणीस, जयंत म्हैसकर (मुख्य व्यवस्थापकीय संचालक MEP इन्फास्ट्रकचर , न.कृ. वेंगुर्लेकर (सहाय्यक आयुक्त ब्रह्नमुंबई महापालिका) दिपक खांबित ( नगर अभियंता,मिरा -भाईंदर) आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री सरनाईक म्हणाले की, “दहिसर टोलनाक्यावर दररोज प्रचंड वाहतूक कोंडी होत असून त्यामुळे ॲम्बुलन्स, स्कूलबस आणि अत्यावश्यक सेवांना अडथळा निर्माण होतो. यामुळे प्रदूषणात भर पडते आणि प्रवाशांचा मौल्यवान वेळ वाया जातो.” हा टोल नाका स्थलांतरित करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. परंतु स्थानिक नागरिकांनी टोल नाक्याच्या स्थलांतरनाला विरोध केला आहे. त्याची बाजू देखील रास्त असून त्यांच्या भुमिकेचा विचार करून टोल नाक्यावरील गर्दी टाळण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित नवीन टोल भरणा प्रक्रिया चालू करण्यासंबंधीचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे सध्याचा टोल नाका कायमस्वरूपी बंद करणे शक्य होईल.

“AI-आधारित टोल प्रणालीचा नवा युगप्रवेश!”

मंत्री सरनाईक यांनी पुढे सांगितले की, “टोल वसुली अधिक गतिमान आणि पारदर्शक करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करावी.
वाहनांच्या नंबर प्लेट स्कॅन करणाऱ्या AI कॅमेऱ्यांद्वारे स्वयंचलित टोल भरणा होईल, ज्यामुळे टोल नाक्यांवरील लांबच लांब रांगा भूतकाळात जातील.”

तसेच, दोन टोलनाक्यांचा भरणा एकाच ठिकाणी करण्याची संकल्पना अमलात आणल्यास वाहतूक आणखी सुरळीत होईल, असेही त्यांनी सांगितले.

“रस्ते विकास व कायमस्वरूपी समाधानाची दिशा”

या बैठकीत पेणकर फाटा, सिग्नल येथील वाहतूक सुलभता आणि दिल्ली दरबार हॉटेल ते दहिसर टोल नाका या मार्गावरील रस्ता रुंदीकरणाची कामे वेगाने पूर्ण करण्याचे निर्देशही देण्यात आले.

(अभिजीत भोसले)
जनसंपर्क अधिकारी
मा. मंत्री परिवहन

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!