संविधान दिन साजरा करणे आता गुन्हा ठरला आहे का? : झीनत शबरीन यांचा संतप्त सवाल; मुंबई युवक काँग्रेसची निदर्शने

मुंबई: संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत राजकीय वातावरण तापले आहे. भाजपच्या काळात संविधानाची प्रस्तावना वाचणे हा देखील गुन्हा ठरला असल्याचा गंभीर आरोप मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष झीनत शबरीन यांनी केला आहे. संविधानाची प्रस्तावना वाचण्यासाठी जमलेल्या युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने त्यांनी हा संताप व्यक्त केला.
नेमके प्रकरण काय?
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत, निवृत्त अधिकारी ए. के. गौतम यांच्या घरासमोर संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन करण्यासाठी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते जमले होते. राहुल गांधींविरोधात पत्र लिहिणाऱ्या २७२ निवृत्त अधिकाऱ्यांमध्ये गौतम यांचा समावेश आहे. त्यांना संवैधानिक मूल्यांची आठवण करून देणे हा या आंदोलनाचा उद्देश होता. मात्र, पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखत ताब्यात घेतले.
काँग्रेसची भूमिका
या कारवाईचा निषेध करताना झीनत शबरीन म्हणाल्या, “आज देश संविधान दिन साजरा करत असताना, आम्हाला संविधानाची प्रस्तावना वाचण्यापासून रोखणे हा लोकशाही मूल्यांवरचा थेट हल्ला आहे. भाजप सरकारच्या दडपशाहीविरोधात आणि संविधान रक्षणासाठी आमचा लढा असाच सुरू राहील.”
पोलिसांनी कार्यकर्त्यांना मरीन ड्राईव्ह येथून ताब्यात घेऊन आझाद मैदानात नेले. त्यानंतर, युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आझाद मैदान आणि मंत्रालयाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन करून आपला निषेध नोंदवला.





