महाराष्ट्रमुंबई

“स्वतः कृत्य करायचं आणि दुसऱ्यावर गलिच्छ आरोप करायचे, हा धंदा त्यांनी आयुष्यभर केला!” – महाड प्रकरणावरून सुनील तटकरे यांचा गंभीर हल्लाबोल

मुंबई: ऐतिहासिक वारसा लाभलेल्या महाड शहर नगरपरिषद निवडणुकीच्या मतदानादरम्यान घडलेल्या निंदनीय प्रकारावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. स्वतःवर झालेल्या आरोपांशी आपला दुरान्वये संबंध नसल्याचे स्पष्ट करत तटकरे यांनी थेट आपल्या विरोधकांवर ‘स्वतः कृत्य करायचं आणि दुसऱ्यावर गलिच्छ आरोप करायचे हा धंदा त्यांनी आयुष्यभर केला’ अशा शब्दांत हल्लाबोल केला आहे.

आरोपांची सखोल चौकशी करा!
खासदार तटकरे यांनी त्यांच्यावर केलेल्या आरोपांची सखोल चौकशी करण्याची मागणी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. ते म्हणाले, “माझ्यावर जो आरोप करण्यात आला त्याच्याशी माझा दुरान्वये संबंध नाही. जे हिस्ट्रीशिटर आहेत, त्यांची यापूर्वीची हिस्ट्री समजून घेत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या आरोपाची सखोल चौकशी करावी आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी.”

निवडणूक नियमांचे उल्लंघन आणि गुंडगिरी:

महाड शहरात झालेल्या प्रकारावर बोलताना तटकरे यांनी थेट निवडणूक आयोगाच्या नियमांच्या भंगाचा मुद्दा उपस्थित केला. “सकाळपासूनच नामदार पुत्र लवाजम्यासह शहरात फिरत होते. त्यांनी मतदान केंद्रात जाऊन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांशी वाद घातला. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार मतदान केंद्रावर फक्त उमेदवार, प्रतिनिधी किंवा पोलिंग एजंट यांनाच प्रवेश असतो. त्यामुळे त्यांनी निवडणूक आयोगाच्या कायद्याचा भंग अगोदरच केला आहे,” असा थेट आरोप तटकरे यांनी केला.

महाडमध्ये शांततेचे वातावरण प्रस्थापित करण्याची गरज असताना ज्या पद्धतीची गुंडगिरी झाली, ती अत्यंत निंदनीय असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सुशांत जाबरे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावरून टोला:

तटकरे यांनी मारहाण झालेल्या सुशांत जाबरे यांच्याबद्दलही भाष्य केले. “सुशांत जाबरे हा एकेकाळी त्यांचा (विरोधकांचा) जवळचा कार्यकर्ता होता. तीन महिन्यांपूर्वीच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे त्यांच्याबद्दल असलेला आकस त्यांनाच माहीत असेल,” असे तटकरे म्हणाले. जाबरे यांनी शिवसेना का सोडली आणि राष्ट्रवादीत का प्रवेश केला हे जगजाहीर असल्याचेही त्यांनी सांगितले.

‘विकृत मनोवृत्ती’ आणि ‘एकेरी भाषे’वरून टीका:

आपल्यावर निराधार आरोप करताना वापरलेल्या भाषेबद्दल तटकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “माझ्यावर निराधार आरोप करत असताना जी भाषा वापरली गेली, आज माझे वय ७१ आहे याचे भान ते विसरलेले दिसतात. एकेरी भाषेत बोलून त्यांनी आपल्या विकृत मनोवृत्तीचे दर्शन उभ्या महाराष्ट्राला घडवले आहे,” अशा शब्दांत त्यांनी विरोधकांवर जबरदस्त टोला लगावला.

मतदानाच्या दिवशी आपण रोहा आणि श्रीवर्धन नगरपंचायत निवडणुकीत मतदारांना आणि सहकाऱ्यांना भेटण्यासाठी गेलो होतो, हे देखील तटकरे यांनी आवर्जून स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!