लॉकडाऊन वाढणार की काही निर्बंध शिथिल होणार?मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत होणार निर्णय
मुंबई,दि.२७:राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी साडेतीन वाजता बैठक होणार आहे. या बैठकीत लॉकडाऊन वाढणार की काही निर्बंध शिथिल होणार यावर चर्चा होणार आहे. मात्र राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत असतानाही महाराष्ट्र सरकार राज्यव्यापी लॉकडाऊन आणखी एक आठवड्यापर्यंत वाढवण्याच्या विचारात असल्याचंही कळतं. त्यामुळे आजच्या बैठकीत काय निर्णय होतो याची उत्सुकता आहे.
गेल्या सुमारे दीड महिन्यांहून अधिक काळ लॉकडाऊन सुरु आहे.अत्यावश्यक सेवेत न मोडणारी राज्यातली जवळपास सर्व दुकाने व व्यवसाय बंद आहेत. त्यामुळे अर्थचक्र ठप्प झाले आहे. या दुकानातून व आस्थापनातून काम करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांचा रोजगार बंद झाला आहे. त्यामुळे १ जून पासून सर्व दुकाने व व्यापार उदीम सुरु करण्यात यावा अशी मागणी व्यापारी संघटनांनी केली आहे. सक्तीने व्यवसाय बंद ठेऊन सरकार मात्र सर्व प्रकारचे कर भरण्याची सक्ती करत आहे, हे नैसर्गिक न्यायतत्वाच्या विरोधात असल्याची भूमिका मांडून काही संघटनांनी न्यायालयात गेल्या आहेत.
मुंबईत कोरोना ची रुग्णसंख्या लक्षणीय रित्या कमी होत असल्याने कोरोना उपायांची कडक अंमलबजावणी करून छोट्या दुकानदारांना व व्यावसायिकांना त्यांची रोजी रोटी व व्यापार उदीम पुन्हा सुरु करण्याची परवानगी मिळावी अशी भावना व्यक्त होत आहे. मात्र असे असले तरी सरकार लॉक डाऊन पुढे अजून १ आठवडा वाढविणार की काही निर्बंधासह ठराविक व्यवसाय करण्यास परवानगी देणार यावर आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तविली जात आहे