महाराष्ट्रमुंबई

“स्वप्न मोठं ठेवा, पाया संविधानाचा ठेवा; ५१व्या संसदीय अभ्यास वर्गात उपमुख्यमंत्री शिंदेंचा तरुणांना संदेश”…..

मुंबई: “भविष्यात तुम्ही कोणत्याही क्षेत्रात पुढे गेलात नेता, अधिकारी, उद्योगपती किंवा पत्रकार झालात, तरी संविधानिक मूल्यांचे भान ठेवून काम केलात तर देशाचा विकास निश्चित आहे,” असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेच्यावतीने आयोजित ५१ व्या संसदीय अभ्यास वर्गाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

आपल्या प्रेरणादायी भाषणात शिंदे यांनी भारतीय लोकशाहीची ताकद, लोकप्रतिनिधींच्या जबाबदाऱ्या आणि विद्यार्थी तरुणाईसमोर असलेल्या संधींचे अत्यंत प्रभावी वर्णन केले. ते म्हणाले की भारतीय लोकशाही म्हणजे फक्त प्रतिनिधिक नाही तर सहभागी लोकशाही आहे.

देशातील १४० कोटी नागरिक विविध धर्म, भाषा, जाती असूनही शांततेने एकत्र राहतात हे लोकशाहीचे अद्वितीय सामर्थ्य आहे. लोकशाही आपल्याला अधिकार देते पण त्या अधिकारांसोबत कर्तव्यांची जाणीव करून देते, असेही त्यांनी नमूद केले.

विधिमंडळातील प्रत्येक निर्णय लाखो लोकांच्या जीवनाला दिशा देतो, त्यामुळे विद्यार्थ्यांनी संसदीय प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव घेतला पाहिजे. पुस्तकातील मजकूर आणि प्रत्यक्ष परिस्थिती यात जमीन-आसमानाचा फरक आहे, तो या अभ्यासवर्गातून स्पष्ट जाणवेल, असे शिंदे म्हणाले.

ते पुढे म्हणाले की आजचे विद्यार्थी म्हणजे उद्याचे नेते, अधिकारी, उद्योगपती किंवा पत्रकार आहेत आणि संविधानाचे भान ठेवून काम केले तर देश निश्चितच प्रगती करेल. आपल्या आयुष्यातील संघर्षमय प्रवासाचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की ते थेट लोकांमध्ये उतरून अनुभवातून शिकत शिकत या स्थानापर्यंत पोहोचले. “पदे ही लोकांनी दिलेली जबाबदारी आहेत; त्यांचा वापर सामान्यांच्या जीवनात बदल घडवण्यासाठीच केला पाहिजे,” असे ते म्हणाले.

विधानसभाध्यक्ष ऍड. राहुल नार्वेकर, उपसभापती नीलम गोऱ्हे आणि इतर मान्यवरांचे कौतुक करत त्यांनी सांगितले की सभागृह शिस्तीत चालणे आणि सत्ता–विरोधक दोघांना समान न्याय मिळणे हे लोकशाहीचे महत्वाचे तत्व आहे.

शेवटी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना ते म्हणाले की अभ्यासवर्ग तुम्हाला सजग नागरिक बनवेल आणि भविष्यातील नेतृत्वाला नवी दिशा देईल. ५१व्या अभ्यासवर्गाचा उद्घाटन सोहळा विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारा आणि लोकशाहीविषयी आदर दृढ करणारा ठरला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!