अशोकवन येथील मच्छि मार्केटबाबत आयुक्तांना बैठक घेण्याचे निर्देश देऊ आ. प्रवीण दरेकरांच्या प्रश्नावर उद्योग मंत्र्याचे आश्वासन

मुंबई: बोरिवली येथील अशोकवन येथे मच्छिमार्केट आहे. त्याचा लिलावही झाला असून ते १०-१५ वर्षे चालूच झालेले नाही. याचा आढावा घेऊन सरकारने महापालिकेला निर्देशीत करावे, असा प्रश्न भाजपा गटनेते आ. प्रवीण दरेकर यांनी विधानपरिषद सभागृहात लक्षवेधीच्या चर्चेवर बोलताना उपस्थित केला. त्यावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी अशोकवन येथील मच्छिमार्केटबाबत महापालिका आयुक्तांना बैठक घेण्याचे निर्देश देऊ, असे आश्वासन दिले.
विधानपरिषद सदस्य सुनिल शिंदे यांनी आज सभागृहात मुंबईतील मच्छिमार विक्रेत्यांच्या मंडईचा मुद्दा लक्षवेधीद्वारे उपस्थित केला. या चर्चेत सहभागी होत आ. प्रवीण दरेकर म्हणाले कि, मच्छिमारांचा विचार होत नाही तर डेव्हलपमेंटचा विचार होतोय. भूखंड मोकळा करेपर्यंत रस असतो नंतर मच्छिमार वाऱ्यावर जातात. मच्छिमारांची पहिली व्यवस्था केली पाहिजे. अनेक मंडई विकसित होताहेत. परंतु अनेक मच्छि मार्केट निविदा काढुनही चालू नाहीत. वर्षांनुवर्षे पडून आहेत. यावेळी उदारहरणार्थ दरेकर यांनी बोरिवली येथील अशोकवन येथे मच्छिमार्केट आहे त्याचा लिलावही झाला असून ते १०-१५ वर्ष चालू झालेले नाही. याचा आढावा घेऊन सरकारने महापालिकेला निर्देशीत करावे. त्याचबरोबर मत्स्य विक्री करणाऱ्यांची व्यवस्था होईपर्यंत त्या भूखंडावर कुठलीही विकासाची कारवाई होऊ नये अशी भूमिका शासन घेणार का? असा सवाल केला.
दरेकर यांच्या प्रश्नावर उत्तर देताना मंत्री उदय सामंत म्हणाले कि, भूखंडावर कुठलीही बांधकामं प्रक्रिया सुरु झालेली नाही. आरक्षणाच्या प्रतीक्षेत भूखंड आहे. नव्या इमारतीत मच्छिमारांना शिफ्ट करण्याची प्रक्रिया सुरु आहे. शिफ्ट करताना रॅम्प पासून गाडीच्या पार्किंग पर्यंतच्या सुविधा असल्या पाहिजेत, त्याही देण्याचे निर्देश देऊ. मच्छिमारांना मच्छि विक्री करताना ज्या सुविधा पाहिजेत त्याही दिल्या जातील असे आश्वस्त केले. त्याचबरोबर अशोकवन येथील मच्छि मार्केटबाबत महापालिका आयुक्तांना बैठक घेण्याचे निर्देश दिले जातील असेही मंत्री सामंत म्हणाले.






