युनेस्कोच्या ‘अमूर्त वारसा’ यादीत दीपावलीचा समावेश! भारतीय संस्कृतीचा जगभर प्रसार होण्यास हातभार: सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे सभागृहात निवेदन

मुंबई:युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा (Intangible Cultural Heritage) यादीमध्ये दीपावलीचा समावेश करण्यात आल्याने भारतीय संस्कृतीचा जगभर प्रचार व प्रसार होण्यास मोठा हातभार लागेल, असे निवेदन सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी विधानमंडळाच्या सभागृहात केले. शेलार यांनी निवेदनात नमूद केले की, महाराष्ट्राची सांस्कृतिक क्षेत्रातील कामगिरी अधोरेखित करणारे मराठा लष्करी भुरचनेचे युनेस्कोचे मानांकन (जो मूर्त स्वरूपाचा वारसा आहे) आपण या वर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मिळवले. आता युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत दीपावलीचा समावेश होणे, ही आपल्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे.
केंद्र सरकारच्या संस्कृती मंत्रालयाने वर्ष २०२५-२६ साठी दीपावलीचे नामांकन केले होते. अंधारातून प्रकाशाकडे, निराशेतून आशेकडे आणि संघर्षातून यशाकडे नेणारा हा सण आपल्या जीवनातील सकारात्मकतेचे प्रतीक आहे. दीपावली हा महाराष्ट्राच्या कृषी संस्कृतीशी आणि मराठी परंपरेशी अतूट नाते असलेला उत्सव आहे, ज्याचा इतिहास निश्चितच प्राचीन आहे.
निसर्गावर आधारित साजरे होणारे सण हे भारतीय संस्कृतीचे वेगळेपण आणि त्याचे जागतिक अद्वितीय मूल्य अधोरेखित करतात, यामुळे भारतीय सण, परंपरा पर्यायाने भारतीय संस्कृतीचा जगात प्रसार होण्यास हातभार लागणार आहे. आपल्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेला हा ऐतिहासिक गौरव मिळवून देण्यासाठी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे हे शक्य झाले, असे नमूद करीत मंत्री शेलार यांनी सभागृहाच्या माध्यमातून त्यांचे आभार व्यक्त केले.






