वलसाड हापूस मानांकन मिळण्यास कोकण कृषी विद्यापीठाचा विरोध…

मुंबई: गेले काही दिवस चर्चेत असलेल्या कोकण हापूस विरुद्ध वलसाड (गुजरात) हापूस शीतयुद्धात आता येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने उडी घेत वलसाड हापूसला मानांकन मिळण्यास ठाम विरोध दर्शवला आहे. महाराष्ट्राची कोकण किनारपट्टी ही आंबा उत्पादनासाठी जगामध्ये नावाजलेली असून, कोकणात सुमारे पावणे दोन लाख हेक्टर एवढ्या क्षेत्रावर हापूस आंब्याची लागवड आहे. कोकणामध्ये हापूस आंब्याचा इतिहास हा सुमारे ४०० वर्षांचा आहे. मुळात पोर्तुगीजांनी अल्फान्सो या नावाने आंब्याची ही जात आणली. मात्र या जातीला हापूस हे नाव कोकणवासियांनी दिले आहे. हापूसला मिळालेली प्रसिद्धी, रंग, स्वाद हा कोकणातील विशिष्ठ अशा हवामानामुळे व जमिनीमुळे आहे.
कोकणातील हापूस आंब्याला भौगोलिक मानांकन मिळण्यासाठी सन २००६ पासून प्रयत्न सुरू होते. याचवेळी देवगड हापूस आणि रत्नागिरी हापूस स्वतंत्र प्रस्ताव होते; मात्र दोन्ही प्रस्ताव एकत्र करून जी – आय रजिस्ट्री, चेन्नई यांच्याकडून हे दोन्ही अर्ज एकत्र करून सन २०१८ मध्ये कोकणातील पाच जिल्ह्यांसाठी हापूस आंबा भौगोलिक मानांकन घेण्यात आहे. अल्फान्सो कोकण हापूस उत्पादक आणि उत्पादक विक्रेते सहकार संस्था, रत्नागिरी आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली हे नोंदणी करणारे रजिस्ट्री आहेत.
कोकण कृषी विद्यापीठाने कोकणातील शेतकऱ्यांसाठी स्थापनेपासून हापूस आंब्याची प्रत उत्पादन टिकून ठेवण्यासाठी पीक उत्पादन पद्धत विकसित केली आहे. त्याचा अवलंब शेतकरी करीत आहेत. विद्यापीठाने विकसित केलेल्या अभिवृद्धी पद्धतीमुळे मोठ्या प्रमाणावर कलमांची निर्मिती होऊन ही कलमे भारतामध्ये व भारताबाहेबर अनेक ठिकाणी गेली आहेत. या प्रत्येक ठिकाणांहून त्या त्या प्रदेशाच्या नावामागे हापूस हा शब्द जोडून मानांकर मिळण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. असे झाले तर तो कोकणच्या शेतकऱ्यांवर मोठा अन्याय होईल. विशेषतः कोकणाव्यतिरिक्त इतर प्रदेशामध्ये उत्पादित केलेल्या अल्फान्सोच्या फळामध्ये कोकणाच्या हापूस आंब्याची चव, स्वाद रंग येत नाही वास्तविक पाहता हापूस ही वेगळी जात असून ती २०२३ साली कोकण कृषी विद्यापीठाने प्रसारित केली आहे.
वलसाड हापूस आंब्याला मानांकन मिळण्यासाठी “जी आय रजिस्ट्री, चेन्नई यांच्याकडे भारतीय किसान संघ, गांधीनगर आणि नवसारी कृषी विद्यापीठ नवसारी गुजरात यांनी ९ फेब्रुवारी २०२५ रोजी अर्ज केला. त्यानुसार जी आय रजिस्ट्री यांना दिनांक १४ ऑक्टोबर रोजी कायदेशीर विरोध डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, आणि कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक विक्रेते संस्था, मर्या. (रत्नागिरी) यांच्याकडून करण्यात आला.
वलसाड हापूस जी-आय नोंदणीसाठी ३० नोव्हेंबर रोजी बौद्धिक संपदा भवन, मुंबई येथे सुनावणी करण्यात आली; मात्र अॅड. हिमांशु काणे (मुंबई) यांनी मुद्देसुद हापूस / अल्फान्सो आणि वलसाड हापूस यातील तांत्रिक, कायदेशीर फरक पटवून दिला. कोर्टाने भारतीय किसान संघ, गांधीनगर यांना एक महिन्याची मुदत देऊन त्यांचे म्हणणे सादर करण्यासाठी संधी दिली आहे.
या सुनावणी दरम्यान सकारात्मक चर्चा झाली असून कोकण हापूस/अल्फान्सो मानांकन निश्चितच अबाधित राहील, अशी विद्यापीठाला खात्री आहे. निकाल विद्यापीठाच्या विरोधात गेला तर डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांमार्फत पुढे सर्वोच्च न्यायालयामार्फत दाद मागितली जाईल, असे विद्यापीठाकडून सांगण्यात आले आहे.






