नाशिक कुंभमेळा २०२७: बोधचिन्ह डिझाईन करा आणि ३ लाख रुपये जिंका!

मुंबई:
* स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आता केवळ १० दिवस बाकी! २० डिसेंबर अंतिम मुदत
* नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे नागरिकांना ‘लोगो’ स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन
* प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे रु. ३ लाख, २ लाख आणि १ लाख रुपयांची बक्षिसे जाहीर
नाशिक, दि. ११ डिसेंबर २५: श्रद्धा आणि अध्यात्माचा महासंगम असलेल्या नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ साठीच्या बोधचिन्ह (Logo) स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आता अवघे दहा दिवस शिल्लक राहिले आहेत! कुंभमेळ्याची नवी आणि आकर्षक ओळख निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित या स्पर्धेसाठी २० डिसेंबर २०२५ ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे.
विभागीय आयुक्त तथा नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम यांनी जास्तीत जास्त नागरिकांनी, डिझायनर्सनी आणि कलाकारांनी या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
💰 बक्षिसांची लयलूट
या स्पर्धेत विजेत्यांना आकर्षक रोख रकमेसह प्रमाणपत्रे दिली जाणार आहेत:
* प्रथम पारितोषिक: ₹ ३,००,०००/- (तीन लाख रुपये)
* द्वितीय पारितोषिक: ₹ २,००,०००/- (दोन लाख रुपये)
* तृतीय पारितोषिक: ₹ १,००,०००/- (एक लाख रुपये)
कुंभमेळ्याचा ‘लोगो’ कसा असावा?
नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे दर बारा वर्षांनी होणारा हा सिंहस्थ कुंभमेळा जगातील सर्वात मोठ्या आध्यात्मिक उत्सवांपैकी एक आहे. नवीन बोधचिन्ह हे २१ व्या शतकाच्या आकांक्षा दर्शवणारे, तसेच नाशिकची समृद्ध संस्कृती, गोदावरी नदीचा शाश्वत प्रवाह आणि त्र्यंबकेश्वरचे अध्यात्मिक महत्त्व प्रतिबिंबित करणारे असावे.
या बोधचिन्हामध्ये भक्ती आणि एकतेची कालातीत भावना, आधुनिकता आणि संदर्भात्मकता यांचा समन्वय असावा. तसेच ते सर्व व्यासपीठांवर (साईनेज, ब्रँडिंग, मर्चंडाईज इत्यादी) संस्मरणीय आणि आकर्षक दिसेल याची काळजी घेणे आवश्यक आहे.
महत्त्वाचे नियम व अटी (नोंदीसाठी):
* प्रवेशिका पाठवण्याची अंतिम तारीख: २० डिसेंबर २०२५.
* बोचचिन्हाची डिझाईन A1 आकाराच्या पोस्टरवर ले-आउटनुसार असावी.
* रंगीत आणि कृष्णधवल प्रतिमा तसेच बोधचिन्हाबाबत १५० शब्दांची माहिती देणारी टिपणी आवश्यक आहे.
* फाइलचा कमाल आकार ५ MB (PDF) असावा.
* टीप: संकल्पना टीप, पोस्टर किंवा कोणत्याही फाईलवर स्पर्धकाचे नाव किंवा वैयक्तिक माहिती नसावी; अन्यथा प्रवेशिका अपात्र ठरेल.
* ही स्पर्धा भारतातील प्रत्येक नागरिकासाठी (किमान वय १२ वर्षे) खुली आहे.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी इच्छुक नागरिकांनी www.mygov.in या वेबसाइटला भेट द्यावी किंवा [email protected] या ई-मेल आयडीवर संपर्क साधावा.






