पत्रकारांच्या सतर्कतेमुळेच समाज सुरक्षित: समीर वानखेडे
पत्रकार विकास संघाचा (PVS) १७ वा वर्धापन दिन उत्साहात; माध्यम क्षेत्रातील दिग्गजांचा 'मीडिया अवॉर्ड्स २०२५' ने गौरव

मुंबई: (महेशपावसकर)”पत्रकारांची नजर अत्यंत सतर्क असते, त्यामुळेच प्रशासकीय अधिकारीही अधिक सावधगिरीने आणि जबाबदारीने काम करतात. जेव्हा पत्रकार आणि प्रशासन मिळून काम करतात, तेव्हाच समाज खऱ्या अर्थाने सुरक्षित राहतो,” असे प्रतिपादन भारतीय महसूल सेवेतील (IRS) ज्येष्ठ अधिकारी समीर वानखेडे यांनी केले.
मालाड (पश्चिम) येथील हॉटेल साई पॅलेस च्या सभागृहात आयोजित पत्रकार विकास संघाच्या (PVS) १७ व्या वर्धापन दिन आणि पुरस्कार वितरण सोहळ्यात ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष आनंद मिश्र, सरचिटणीस अजय सिंह आणि मुख्य सल्लागार सुनील सिंह यांनी समीर वानखेडे यांना शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित केले. याप्रसंगी झोन ११ चे डीसीपी संदीप जाधव यांची विशेष उपस्थिती होती.
*विविध श्रेणीतील पुरस्कारांचे वितरण*
पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पत्रकारांचा यावेळी गौरव करण्यात आला. यावर्षीचे प्रमुख पुरस्कार खालीलप्रमाणे आहेत:
* पीव्हीएस ज्युरी अवॉर्ड २०२५ (सर्वोत्कृष्ट संपादक): संजय सावंत (संपादक, आपलं महानगर)
* पीव्हीएस ज्युरी रजत जयंती अवॉर्ड: ओमप्रकाश तिवारी (दैनिक जागरण)
* जीवन गौरव पुरस्कार (पत्रकारिता): शेषनाथ सिंह (दोपहर का सामना)
* जीवन गौरव पुरस्कार (छायाचित्रण): प्रदीप धीवर
* बेस्ट पॉलिटिकल रिपोर्टर: दीपक कैतके (दैनिक महासागर)
* बेस्ट रिपोर्टर (जनरल): भानु प्रकाश मिश्र (दैनिक भास्कर)
* बेस्ट क्राईम रिपोर्टर: डॉ. अखिलेश तिवारी (एनबीटी)
* बेस्ट यंग जर्नलिस्ट: नम्रता अरविंद दुबे
* बेस्ट डिजिटल जर्नलिस्ट: प्रवीण नलावडे
* बेस्ट टीव्ही रिपोर्टर: कृष्णा सोनारवाडकर
* बेस्ट फोटोग्राफर: शैलेश जाधव
* बेस्ट व्हिडिओ जर्नलिस्ट: राजेंद्र दशरथ धयालकर
याव्यतिरिक्त, अंशकालिक पत्रकारितेसाठी अनिल शुक्ला (एनबीटी) आणि संपादकीय कार्यासाठी विक्रम जादव यांना ज्युरी अवॉर्ड देऊन गौरविण्यात आले.


मान्यवरांची उपस्थिती
या सोहळ्याला राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते. यामध्ये आमदार संजय उपाध्याय, आमदार असलम शेख, भाजप नेते आचार्य पवन त्रिपाठी, आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली, माजी राज्यमंत्री अमरजीत मिश्र, ‘दैनिक प्रहार’चे संपादक पद्मभूषण देशपांडे, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे, राजा अदाटे, महेश पावसकर,परेश समजीसकर,प्रशांत बारसिंग,विनोद यादव,विजय सिंह कौशिक यांच्यासह अनेक मान्यवरांचा समावेश होता.

सामाजिक क्षेत्रातील योगदानासाठी डॉ. अजय गुप्ता, प्रेम प्रकाश दुबे, सुनील काबरा आणि अभिषेक जाजू यांना ‘पीव्हीएस पत्रकार मित्र सन्मान’ प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभय मिश्र आणि सुनील सिंह यांनी केले. सुप्रसिद्ध गायक विनोद दुबे यांच्या गीतांनी आणि हास्य कवी महेश दुबे व मुकेश गौतम यांच्या कवितांनी कार्यक्रमात रंगत भरली.







