उद्या ३ जून रोजी महापालिका व शासकीय केंद्रावरील लसीकरण बंद!
मुंबई,दि.२: मुंबईत सध्या ४५ वर्षांवरील व्यक्तींचे मोफत लसीकरण महापालिका आणि शासकीय रुग्णालयांच्या माध्यमातून सुरू आहे. मात्र पुन्हा लसींचा तुटवडा निर्माण झाल्याने, गुरुवारी ३ जून रोजी महापालिका व शासकीय केंद्रावरील लसीकरण बंद राहणार आहे.
लस साठा संपल्यामुळे लसीकरण बंद
मुंबई महापालिकेच्या २४५ केंद्रांपैकी ८१ केंद्र आणि शासकीय रुग्णालयांमधील २५ केंद्रांवर लसीकरण करण्यात येत असून, कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरण मोहिमेंतर्गत पुरेसा लससाठा उपलब्ध नसल्यामुळे, मुंबई महापालिका क्षेत्रातील शासकीय आणि महापालिका लसीकरण केंद्रांवर गुरुवार ३ जून २०२१ रोजी लसीकरण बंद राहणार असल्याची माहिती महापालिकेने एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
लसींचा साठा ज्या प्रमाणात प्राप्त होईल, त्या अनुरुप योग्य निर्णय घेऊन मुंबईकरांना सातत्याने अवगत करण्यात येते. दरम्यान, गुरुवारी दिवसभरामध्ये लस साठा प्राप्त होण्याची शक्यता असल्याचेही प्रशासनाने म्हटले आहे. लस साठा उपलब्ध झाल्यास शुक्रवार पासून लसीकरण पुन्हा सुरू करण्यात येईल, असेही प्रशासनाने म्हटले आहे