काँग्रेस मंत्री विजय वडेट्टीवार तोंडावर आपटले.. निर्बंध हटविले नाहीत-सरकारचे स्पष्टीकरण

मुंबई,दि.३: मुंबई व महाराष्ट्रातील लॉकडाऊन बद्दल नेहमी सरकार च्या अधिकृत घोषणे अगोदरच पत्रकारांना माहिती फोडण्याची हौस असलेले काँग्रेस चे ज्येष्ठ नेते व मदत-पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची आज चांगलीच गोची झाली. आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातील लॉकडाऊन ५ टप्प्यात हटविणार असल्याची घोषणा त्यांनी केली. आणि जणू काही महाराष्ट्र कोरोना मुक्त झाल्याप्रमाणे सुमारे १८ जिल्ह्यातील सर्व निर्बंध हटविण्यात येणार असून इतर जिल्ह्यांची वर्गवारी ४ टप्प्यात करण्यात आली असून त्यात देखील विविध निर्बंध हटविण्यात येणार असल्याचे वडेट्टीवार यांनी जाहीर केले आणि महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली.
महाराष्ट्रात ५ टप्प्यांमध्ये अनलॉकची घोषणा करतानाच त्यामध्ये त्यांनी राज्यातल्या सर्व जिल्ह्यांची वर्गवारी देखील सांगितली. या घोषणेनुसार उद्यापासून म्हणजेच शुक्रवार ४ जून पासून अनलॉक ची अंमलबजावणी सुरू होईल, असं देखील जाहीर केले.
मुख्यमंत्र्यांच्या जनसंपर्क विभागाने तातडीने या वृत्ताची दखल घेऊन या बाबत लवकरच अधिकृत माहिती दिली जाईल असे कळविले आणि त्यानंतर अवघ्या काही तासांतच वडेट्टीवार यांनी जाहीर केलेली अनलॉक ची नियमावली विचाराधीन असून अद्याप त्याची अंमलबजावणी करण्यात येणार नसून सध्या असलेले निर्बंध कायम राहणार असल्याचे जाहीर केले त्यानंतर मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मुंबईतील पत्रकार परीषदेत तत्वत: हा शब्द माझ्याकडून म्हणायचा राहिला असे सांगत सारवासारव केली. पाच टप्प्यात करण्यात येणार्या अनलॉकलाच्या निर्णयाला तत्वत: मान्यता मिळाली आहे. मात्र या निर्णयाची अधिकृत घोषणा राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे करतील, असे स्पष्टीकरण अखेर त्यांना करावे लागले.
दरम्यान ‘करोनाचा संसर्ग अजूनही आपण पूर्णपणे थोपविलेला नाही. ग्रामीण भागात काही ठिकाणी अजूनही संसर्ग वाढत आहे. कोरोना विषाणूचे घातक आणि बदलते रूप लक्षात घेऊनच निर्बंध शिथिल करावयाचे किंवा कसे याविषयी निश्चित करावे लागेल.राज्यातील निर्बंध उठविण्यात आलेले नाहीत’, असे राज्याच्या आरोग्य मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
‘ब्रेक दि चेन मध्ये काही प्रमाणात निर्बंध शिथिल करावयास सुरुवात केली आहे. या पुढे जाताना आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून पाच टप्पे ठरविण्यात येत असून यासाठी साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता हे निकष ठरविण्यात येत आहेत. राज्यात या निकषांच्या आधारे निर्बंध कडक किंवा शिथिल करण्यासंदर्भात विस्तृत मार्गदर्शक सूचना शासन निर्णयाद्वारे अधिसूचित करण्यात येतील’, असे देखील आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
यामुळे असे निर्णय जाहीर करताना महाविकास आघाडीच्या मंत्र्यांमध्ये व खात्यांमध्ये एकमत नसल्याचे परत एकदा स्पष्ट झाले आहे