फडणवीस सरकारच्या काळात शिवसेनेला गुलामासारखी वागणूक मिळाली
शिवसेना खासदार संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप

जळगाव: भाजप शिवसेना युतीच्या असलेल्या देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात पाच वर्षात शिवसेना संपवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला गेला. गावोगावी शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न केला गेला. हा प्रयत्न आपण सत्तेत असताना करण्यात आला. फडणवीस सरकारच्या काळात पाच वर्षे सत्तेत असूनही आपण गुलाम होतो. त्यावेळी गुलामासारखी वागणूक मिळाल्याचं धक्कादायक वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. ते जळगाव जिल्ह्यात शिवसेनेच्या मेळाव्यात बोलत होते.
काँग्रेस पक्ष सध्या काहीसा कमकुवत वाटत असला तरी देशाच्या पातळीवर काँग्रेस पक्षाशिवाय कोणतीही प्रमुख आघाडी होणं अशक्य आहे, असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ते म्हणाले की, काँग्रेस हा जुना पक्ष आहे आणि आजही त्यांची अनेक राज्यांमध्ये चांगली पकड असल्याचं दिसून येते. भक्कम विरोधी पक्ष उभारणीसाठी सर्वच प्रादेशिक पक्षांची मजबूत आघाडी होणे गरजेचे असल्याची आपली नेहमीच मागणी राहिली आहे, असं राऊत म्हणाले. मोदींना पर्याय म्हणून विरोधकांकडून चाचपणी केली जात आहे का? असा प्रश्न राऊत यांना विचारला होता.
प्रशांत किशोर आणि शरद पवार यांच्या भेटीबाबत बोलताना संजय राऊत यांनी म्हटलं की, प्रशांत किशोर हे काही कुठल्या राजकीय पक्षाचे नेते नाहीत. प्रशांत किशोर हे प्रोफेशनल पॉलिटिकल स्टॅटिजिस्ट आहेत. त्यांनी आमच्यासाठी काम केले आहे, काँग्रेससाठी काम केले आहे. त्यांच्यासोबत अनेक राजकारण्यांच्या भेटी होत असल्या तरी त्या पक्षाच्या विस्ताराच्या संदर्भात होऊ शकतात. त्यामुळे प्रशांत किशोर हे शरद पवार यांना भेटल्याने कोणतीही राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता नाही असं राऊत यांनी म्हटलं आहे.
मराठा आरक्षणासंदर्भात बोलताना ते म्हणाले की, हा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा केली आहे. हा तिढा सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचं मोदींना साकडं घातलं आहे. त्यासाठी घटना दुरुस्ती करावी लागत असेल ती त्यांनी करावी, त्याला शिवसेना पाठिंबा देणार असल्याची सेनेची भूमिका राहणार असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे.
उत्तर महाराष्ट्र दौरा हा संघटनात्मक बांधणीसाठी केला जात आहे. त्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेत आहोत. मुंबई आणि कोकणानंतर शिवसेना पक्षावर जळगाव जिल्ह्यातून भरपूर प्रेम केले आहे. आतापर्यंत जळगावातून भरपूर आमदार सेनेला मिळाले आहेत. मात्र पुढील काळात खासदारही सेनेचा असावा अशी शिवसैनिकांची इच्छा आहे. शिवसैनिकांची ही मागणी आपण वरिष्ठांकडे कळवणार असल्याचं राऊत यांनी सांगितलं.