व्यावसायिक अविनाश भोसलेंना ईडीने बजावले नवीन समन्स

पुणे: पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक ‘रिअल इस्टेट किंग’ अविनाश भोसले यांना ईडीने समन्स बजावले आहे. आज (गुरुवार 1 जुलै) रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश ईडीने दिले आहेत. मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने अविनाश भोसलेंना समन्स बजावले आहे. भोसले अंमलबजावणी संचलनालय कार्यालयात चौकशीला हजर राहणार का, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
अविनाश भोसलेंच्या मुलाचीही चौकशी
अविनाश भोसले यांचा मुलगा अमित भोसले यालाही ईडीने समन्स बजावले आहे. अमित भोसलेला उद्या (शुक्रवार 2 जुलै) रोजी चौकशीला हजर राहण्याचे आदेश आहेत. पुण्यातील एका जमिनीवर अविनाश भोसले यांनी बांधकाम केलं आहे. ही जमीन सरकारी असल्यामुळे याबाबत पुण्यात ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हायकोर्टाकडून दिलासा नाही
ईडीने गुन्हा रद्द करावा यासाठी अविनाश भोसले यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. त्यावर हायकोर्टानेही अविनाश भोसले यांना चौकशीला सामोरे जाण्याचे आदेश दिले आहेत. मुंबई हायकोर्टाकडून कोणतीही सवलत न मिळाल्याने अविनाश भोसले यांना ईडीच्या चौकशीला समोर जावं लागत आहे.
40 कोटींची मालमत्ता जप्त
अविनाश भोसले यांची 40 कोटी 34 लाख रुपयांची मालमत्ता आतापर्यंत जप्त करण्यात आली आहे. फेमा कायद्याअंतर्गत ईडीने भोसले यांची पुणे आणि नागपुरातील मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. विदेशी चलन प्रकरणात भोसले यांची दोन वेळा चौकशी झाली होती. चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आलं होतं. या प्रकरणात त्यांच्या कुटुंबियांचीही चौकशी झाली होती.
ईडीकडून यापूर्वी दंडात्मक कारवाई
दरम्यान, अविनाश भोसले यांच्यावर ईडीने यापूर्वी फेमा कायद्यांतर्गत कारवाई करत 1 कोटी 83 लाखांचा दंड केला होता. 2007 मध्ये अमेरिका आणि दुबई दौरा करुन भारतात येताना परकीय चलन आणि महागड्या वस्तू कस्टम ड्युटी न भरता चोरून आणल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली होती. त्यांचा पासपोर्टही जप्त करण्यात आला होता. यापूर्वी त्यांची मुंबईत चौकशी झाली होती. आता पुण्यातल्या कार्यालयात ईडीने चौकशी सुरु केली आहे. 2017 साली इन्कम टॅक्स विभागाने अविनाश भोसले यांच्या घरी छापा टाकल्यानंतर ते पुन्हा चर्चेत आले होते.
मुंबईत 103 कोटींच्या फ्लॅटची खरेदी!
अविनाश भोसले यांनी दक्षिण मुंबईत एक डुप्लेक्स फ्लॅट खरेदी केला आहे. अविनाश भोसले यांच्या ‘एबी’ज रिअलकॉन एलएलपी या कंपनीने ही गुंतवणूक केली आहे. या फ्लॅटसाठी त्यांनी 103 कोटी 80 लाख रुपये मोजले आहेत.