Breaking-ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार कालवश:चित्रपट सृष्टीवर शोककळा

मुंबई : आपल्या सहज सुंदर अभिनयाने भारतीय सिनेसृष्टी गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांचे आज सकाळी ७.३० वाजता मुंबई येथे निधन झाले. ते 98 वर्षांचे होते. मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. दिलीपकुमार यांच्या निधनाने बॉलिवूडसह जगभरातील त्यांच्या चाहत्यांवर शोककळा पसरली आहे.
दिलीप कुमार यांच्यावर मुंबईतल्या हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू होते. अलीकडेच उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देखील देण्यात आला होता. परंतु पुन्हा त्यांना श्वसनाचा त्रास सुरू झाल्यामुळे हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आज अखेर सकाळी ७.३० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.
दिलीपकुमार यांचा जन्म पाकिस्तानमधल्या पेशावरमध्ये झाला होता. त्यांचं मुळ नाव मोहम्मद युसूफ खान असं होतं पण ते सिनेसृष्टीत दिलीपकुमार या नावानेच ओळखले जात होते.
उत्कृष्ट अभिनेता म्हणून सर्वाधिक फिल्मफेअर अवॉर्ड जिंकण्याचं रेकॉर्डही दिलीपकुमार यांच्याच नावावर आहे.
1944 साली चित्रपटसृष्टीत पदार्पण
बॉम्बे टॉकिजनं 1944 साली निर्माण केलेल्या ज्वार भट्टा या चित्रपटातून दिलीपकुमार यांनी हिंदी सिनेमात पदार्पण केलं. तर 1998 ला आलेला ’किला’ हा त्यांचा शेवटचा सिनेमा ठरला.
दिलीप कुमार यांचे सुपरहिट चित्रपट
अंदाज, दाग, देवदास, आझाद, मुघल ए आझम, गंगा जमूना, राम और शाम, क्रांती, शक्ती, मशाल, कर्मा, सौदागर असे काही सुपरहिट सिनेमे दिलीपकुमार यांच्या नावावर आहेत.
ट्रॅजिडी किंग म्हणून ओळख
दिलीप कुमार हे झुंजार वृत्तीचे होते. त्यांच्या आयुष्यात अनेक चढउतार आले. परंतु त्यांनी यशस्वीपणे त्यावर मात केली. अगदी आयुष्याच्या 98 व्या वर्षी देखील ते आजारावर मात करुन घरी परतले. म्हणजे या वयात देखील त्यांची जिद्द कमालीची होती. त्यांची ट्रॅजिडी किंग म्हणून ओळख होती.






