
मुंबई : मुंबई महापालिकेवर गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेची सत्ता आहे. मात्र महापालिकेत चिखल झाला असून महापालिकेच्या चिखलात नक्कीच कमळ फुलणार असा विश्वास भाजपमध्ये नुकताच प्रवेश केलेल्या माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह यांनी आज व्यक्त केला.
शिवसेना आजपर्यंत राज्य सरकारकडून सहकार्य मिळत नसल्याचा आरोप करत होती. मात्र आता महापालिकेत व राज्यात त्यांचीच सत्ता असल्याने त्यांनी करुन दाखवावे असे आव्हान त्यांनी दिले. मुंबईकरांनी आता निर्णय घेतला असून मुंबईकर येत्या निवडणुकीत परिवर्तन घडवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आपण भाजपमध्ये साधा कार्यकर्ता म्हणून प्रवेश केला असून पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडण्यास तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे आयोजित करण्यात आलेल्या वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्यामागील कारणांचा उहापोह कृपाशंकर सिंह यांनी केला.
कृपाशंकर सिंह म्हणाले, 370 कलम हटवण्याला विरोध करण्याच्या मुद्यावरुन काँग्रेस पक्षातून बाहेर पडून भाजपमध्ये मी प्रवेश केला. काँग्रेस व पाकिस्तानची भाषा एकच झाली. पक्षापेक्षा देश मोठा असल्याने पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. उत्तरप्रदेशमधील जौनपूर येथून विधानसभा निवडणूक लढवण्याबाबतच्या प्रश्नावर बोलताना तेव्हा जी परिस्थिती असेल त्याप्रमाणे व पक्ष सोपवेल त्याप्रमाणे जबाबदारी पार पाडणार असल्याचे उत्तर त्यांनी दिले. उत्तर प्रदेश ही माझी जन्मभूमी असून महाराष्ट्र ही माझी कर्मभूमी असल्याचे ते म्हणाले. भाई जगतापांच्या टीकेला उत्तर देताना सिंह म्हणाले, महापालिकेच्या निवडणुकीची मतमोजणी होईल त्यावेळी त्यांना त्यांच्या टीकेचे उत्तर मिळेल. मुंबईकर महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना कंटाळले असून पुढील निवडणुकीत भाजप महापालिकेच्या सत्तेत येईल, असे आपल्याला असलेल्या अनुभवावरुन सांगत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज व भाजप संभाव्य युतीबाबत आपल्याला काही माहिती नसून त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करण्यास त्यांनी नकार दिला.
काँग्रेसने 370 कलम हटवण्याला विरोध केला व भाजपने 370 कलम हटवून देश प्रथम या भावनेला महत्त्व दिले त्यामुळे राष्ट्रीय विचारधारा म्हणून आपण भाजपमध्ये प्रवेश केला असल्याचे कृपाशंकर सिंह म्हणाले. `दल बदला है दिल नही’ अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मुंबई महापालिकेत यावेळी सत्ता परिवर्तन अटळ असल्याचा दावा त्यांनी केला.
प्रारंभी पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री. नरेंद्र वि. वाबळे यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन कृपाशंकर सिंह यांचे स्वागत केले. संयुक्त कार्यवाह खलिल गिरकर यांनी आभार मानले.