
मुंबई:महाविकास आघाडी सरकारचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा हुबेहूब आवाज काढत एका व्यक्तीने मंत्रालयात फोन केला होता. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत बोलून संबंधित व्यक्तीने फोन ठेवून दिला. शंका आल्याने फोन पडताळणीत बिंग फुटले. याप्रकरणी मुंबई क्राईम ब्रँचने एका व्यक्तीस पुण्यातून अटक केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आवाज काढत सदर व्यक्तीने तीन दिवसांपूर्वी मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर असलेल्या मुख्यमंत्री सचिवालयात फोन केला होता. ‘मी सिल्व्हर ओक येथून बोलतोय’, असे म्हणत या व्यक्तीने फोन घेणारे मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव यांच्यासोबत बदल्यांसदर्भात चर्चा केली.
दरम्यान, पवार हे सध्या संसद अधिवेशनानिमित्त दिल्लीत आहेत. त्यामुळे या फोनबाबत अधिकाऱ्यास शंका आली. त्याने खातरजमा करण्यासाठी पवार यांचे दक्षिण मुंबईत निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओक येथे फोन केला. त्यावर साहेबांनी असा कोणताही कॉल केलेला नाही, असे तेथील आॅपरेटरकडून सांगण्यात आले.
त्यामुळे प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत मुख्यमंत्री सचिवालयाने गावदेवी पोलीसांत गुन्हा दाखल केला. त्याआधारे पोलिसांनी बुधवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे. याप्रकरणी एका व्यक्तीस पुण्यातून अटक करण्यात आली आहे.
तीन ते चार दिवसांपूर्वी हा फोन आला होता. बदल्यांबाबत बोलताना काही जमीन व्यवहारासंबंधी फाइलवर शेरा मारण्यास सदर व्यक्तीने सांगितल्याचेही समजते.