समाजातील दुर्लक्षित घटकांचे कोविड लसीकरण करण्यासाठी ४ फिरती लसीकरण केंद्रे
आमदार सुनिल प्रभु यांची विधीमंडळातील मागणी मान्य

मुंबई: अंथरुणाला खिळलेले रुग्ण, एचआयव्ही रुग्ण, नाईलाजाने देहविक्रय करुन उदरनिर्वाह करणाऱ्या महिला, तृतीयपंथी, बांधकाम कामगार, स्थलांतरित कामगार, रस्त्यावरील विक्रेते, बेघर अशा निरनिराळ्या समाज घटकांना मिळणार लसीकरणाचा आता लाभ मिळणार आहे.
शिवसेना विधीमंडळ मुख्य प्रतोद, आमदार, माजी महापौर सुनील प्रभू यांनी दुर्लक्षित घटकांचे कोविड लसीकरण करण्याची मागणी विधीमंडळाच्या अधिवेशनात शासनातर्फे मांडण्यात आलेल्या ठरावाच्या वेळी बोलताना करून, सरकारचे लक्ष वेधले होते. यावर नियोजन करून लवकरच लसीकरण करण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले होते. त्या नुसार महापालिकेने नियोजनबध्द कार्यक्रम आखला आणि काल पासून दुर्लक्षित घटकांचे कोविड लसीकरण करण्यासाठी मुंबईत ४ फिरते लसीकरण केंद्र सुरू झाली आहे.
कोविड – १९ प्रतिबंधक लस घेण्याची इच्छा असूनही, काही अपरिहार्य कारणांनी लसीकरण केंद्रांपर्यंत येऊ न शकणाऱ्या पर्यायाने दुर्लक्षित राहणाऱ्या समाज घटकांचे लसीकरण करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका आणि व्हॅक्सिन ऑन व्हिल्स्, अमेरिकन इंडिया फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ४ फिरते लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहेत.
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांच्या हस्ते झेंडा दाखवून या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
या समाज घटकांच्या कोविड प्रतिबंधक लसीकरणासाठी प्रारंभी एकूण ४ फिरते लसीकरण केंद्र (मोबाईल व्हॅक्सिनेशन युनिट) सुरु करण्यात आले आहेत. प्रत्येक फिरत्या केंद्रामध्ये १ प्रशिक्षित डॉक्टर, २ परिचारिका, २ वैद्यकीय सहाय्यक, रुग्णवाहिका चालक उपलब्ध राहणार आहेत. त्यांना लॅपटॉप आणि वायफाय इंटरनेट सुविधा पुरविली जाणार आहे.






