आरे कॉलनी,गोकुळधाम, दिंडोशी परिसरात पुन्हा बिबट्यांचा खुलेआम संचार: वनखाते व लोकप्रतिनिधी सुस्त !
पहा व्हिडियो…

मुंबई: आरे कॉलनी, गोकुळधाम व दिंडोशी या परिसरात काही दिवसांपासून बिबट्याने जणू उच्छाद मांडला असून तिन्ही त्रिकाळ मानवी वस्तीत येणे सुरु केले असून ३० सप्टेंबर रोजी आरे कॉलनीतील कामावरून परतणाऱ्या एका महिलेवर हल्ला करून तिला जखमी केले आहे.
आरे कॉलनीतील युनिट नं ३१ ( प्रभाग ५२ ) मधील रहिवासी लक्ष्मी उंबरसडे ही महिला ३० सप्टेंबर च्या रात्री ९.३० च्या सुमारास घरी परत येत असताना तीच्यावर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात सदर महिला जखमी झाली.
गेले काही महिने दिंडोशी न्यू म्हाडा कॉलनी,आरे येथे बिबटया सतत येत आहे.दिंडोशी न्यू म्हाडा कॉलनीतील रॉयल हिल्स सोसायटी मधील ’आईसाहेब’ या बंगल्याच्या गच्चीत उडी घेतल्याची घटना ताजी असतानाच गेल्या सोमवारी पहाटे ओबेरॉय मॉल समोरील शिवधाम संकुल परिसरात बिबटया आला होता.तर दोनच दिवसांपूर्वी ओबेरॉय वूड्स सोसायटी च्या बी टॉवर नजीक त्याने पहाटे ३ वाजता फेरी मारली होती. दरम्यान येथील परिसरात बिबटयाचा होणारा वावर लक्षात घेता वन विभागाने येथे पिंजरा लावून या बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.मात्र वनविभाग किंवा येथील लोकप्रतिनिधी जो पर्यंत कुणाचा बळी जात नाही तोपर्यंत गंभीर होणार नाहीत असे येथील रहिवासियां मध्ये बोलले जात आहे.
आरे मधील या हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर प्रभाग 52 च्या भाजपा नगरसेविका प्रीती सातम या घटना स्थळी जाऊन त्यांनी सदर महिला व तिच्या कुटुंबीयांची भेट घेतली, तसेच त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला व रात्री प्रवास करताना नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन केले. याठिकाणी पथदिव्यांची व्यवस्था करण्याच्या संदर्भात अधिकाऱ्यांची सुद्धा बोलणी केली असून लवकरच त्या संदर्भात कार्यवाही होईल अशी माहिती त्यांनी दिली.
पहा व्हिड़ियो