१८ वर्षांवरील अनाथांना ‘तर्पण’ देतेय मोलाची साथ
भाजप प्रदेश महामंत्री श्रीकांत भारतीय यांचे सामाजिक योगदान

मुंबई, बुधवार : अठरा वर्षांवरील अनाथ ही समाजातील गंभीर समस्या आहे. अशी मुले गुन्हेगारी जाळयात सापडण्याची दाट शक्यता असते. म्हणून ती सज्ञान होण्यापूर्वी त्यांच्याशी संवाद साधण्याची परवानगी सामाजिक संस्थांना दिली पाहिजे. तसेच या समस्येकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे, असे प्रतिपादन तर्पण फाऊंडेशन या एनजीओचे संस्थापक – अध्यक्ष व महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्षाचे महामंत्री श्री. श्रीकांत भारतीय यांनी आज केले.
मुंबई मराठी पत्रकार संघाने आयोजित केलेल्या `18 वर्षांवरील अनाथांची समस्या’ या विषयावरील वार्तालापात ते बोलत होते. प्रारंभी संघाचे अध्यक्ष नरेंद्र वि. वाबळे यांनी प्रास्ताविक करून श्री. भारतीय यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार केला.
या प्रसंगी बोलताना श्री. भारतीय म्हणाले की, 18 वर्षांवरील अनाथ तरुण – तरुणींना प्रामुख्याने सहा गोष्टींची गरज असते. त्या म्हणजे मार्गदर्शन, शिक्षण, घर, अन्न, कुटुंब आणि संकट काळात मागे उभे राहणारे लोक. या गोष्टींची पूर्तता झाल्यास अशा मुलांचे भवितव्य घडू शकते. अशा मुलांना उच्च शिक्षण दिल्यास, त्यांना त्यांच्या पायावर उभे केल्यास त्यांच्या लग्नाची समस्यादेखील निर्माण होत नाही. तर्पण फाऊंडेशन अशा 513 अनाथ मुलांचा सांभाळ करीत असून त्यांच्यावर मायेची पाखर करीत आहे. तर्पण फाऊंडेशनचे 60 संचालक असून केवळ पती-पत्नींची जोडी आम्ही संचालक मंडळावर घेतली आहे. जेणेकरून या अनाथ मुलांना आई-वडिलांची माया मिळू शकेल.
18 वर्षांवरील अनाथ मुलांचा सांभाळ करण्याचे काम तर्पण फाऊंडेशन सध्या फक्त महाराष्ट्रात करीत असले तरी वर्षभरात हे मॉडेल देशभरात लोकप्रिय होईल, असा आत्मविश्वास श्री. श्रीकांत भारतीय यांनी व्यक्त केला.
एनजीओ चालवीताना पारदर्शकता महत्त्वाची असून पारदर्शकतेमुळे विश्वासार्हता निर्माण होते. त्यातून काम सोपे होते. आपला संकल्प पवित्र असल्यास तो अवश्य सिद्धीस जातो असा कानमंत्र आपल्याला आपल्या पिताजींनी दिल्याचे देखील श्री. भारतीय यांनी सांगितले. तर्पण फाऊंडेशन फक्त अनाथालयातून बाहेर पडलेल्या 18 वर्षांवरील अनाथ मुलांचा सांभाळ करण्याचे काम करीत असून प्रत्येक अनाथालयाशेजारी अनुरक्षण गृह असावे, असे ते म्हणाले.
श्री. अमेय महाजन यांनी श्री. भारतीय यांचा परिचय करून दिला तर ज्येष्ठ पत्रकार श्री. महेश पावसकर यांनी आभार मानले.