
सिंधुदुर्ग:येथील चिपी विमानतळाचे उदघाटन होऊन १० दिवस देखील झाले नाहीत मात्र धावपट्टीवर अचानक अवतरलेल्या एका कोल्ह्यामुळे येथे विमान उतरू शकले नाही व विमानाला १० मिनिटे हवेत घिरट्या घालण्याची वेळ आली.
सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाच्या धावपट्टीवर सोमवारी अचानक आलेल्या या कोल्ह्यामुळे सुरक्षा यंत्रणेचीही तारंबळ उडाली.
सिंधुदुर्ग विमानतळ सुरु झाल्यानंतर काल या विमानतळावर मुंबईवरून आलेल्या विमानाला धावपट्टीवर उतरण्यासाठी दहा मिनिटे अवकाशात घिरट्या घालण्याची वेळ आली.
चिपी येथील सिंधुदुर्ग विमानतळाच्या आजूबाजूला कोल्ह्यांचा कळप आहे आणि हे कोल्हे आपल्या भक्ष्यासाठी फिरत असतात. दरम्यान विमानतळाचे उद्घाटन झाल्यानंतर या विमानतळावर पहिल्यांदाच कोल्ह्याचे दर्शन झाले. विमानसेवा सुरु झाल्यानंतर काही दिवसांनी या धावपट्टीवर कोल्ह्यांचा वावर दिसला होता.
धावपट्टीवर कोल्हा असल्याचे विमानाच्या पायलटला समजताच त्याने तात्काळ विमान पुन्हा आकाशात झेपावले आणि संबंधित यंत्रणेला या कोल्ह्याला धावपट्टीवरून बाहेर काढण्यास सांगितले. या कोल्ह्याला धावपट्टीवरून बाहेर काढल्यानंतर दहा मिनिटांनी विमान धावपट्टीवर उतरविण्यात आले. यामुळे प्रवाशांमध्ये सुरुवातीस भिती निर्माण झाली होती. तसेच यावरुन विविध चर्चा रंगल्याचंही पाहायला मिळालं.