जैतापूर प्रकल्पामुळे कोकणाला काय मिळणार हे पाहावं लागेल:आम्ही स्थानिकांसोबत-उदय सामंत

जैतापूर अणू उर्जा प्रकल्पासाठीच्या अणू भट्ट्या उभारणीसाठी केंद्राने मंजुरी दिली आहे. आता यावरून राजकारण तापताना दिसत असून, शिवसेनेकडून या प्रकल्पाला विरोध करण्यात आला आहे.जैतापूर प्रकल्पामुळे कोकणाला काय मिळणार हे पाहावं लागेल. शिवाय, आम्ही स्थानिकांसोबत असून स्थानिकांची भूमिका ती आमची भूमिका असेल अशी प्रतिक्रिया उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री तथा शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी दिली आहे. ते रत्नागिरीमध्ये बोलत होते. सामंत पुढे बोलताना म्हणाले की, यापूर्वी देखील शिवसेनेनं आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. पण, स्थानिकांच्या विरोधात जाऊन आम्ही निर्णय घेणार नाही. स्थानिकांचा निर्णय अंतिम असेल.
अणु ऊर्जा हवी कशाला? विजेची कमतरता आहे का या देशामधे ? सोलर एनर्जीकडे बघा,-खासदार विनायक राऊत
राज्यसभेत लेखी उत्तरात अणु ऊर्जा विभागाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी जैतापूर अणु ऊर्जा प्रकल्पाला केंद्र सरकारने तत्वतः मान्यता दिली आहे अशी माहिती दिली,मात्र यावरुन शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी सडकून टीका केली. “गाडला गेलेला विषय हा केंद्र सरकार पुन्हा उकरुन काढत आहे. वीजेचे उतरलेले – कमी झालेले दर बघता अणु ऊर्जेपासून तयार होणाऱ्या वीजेचे दर हे केंद्र सरकारला परवडणार नाही, एवढ्या वाढीव दराने वीज घ्यायला कोणी तयार होणार नाही. हा पांढरा हत्ती पोसण्यासारखं आहे. बिनडोकपणाचा हा विचार आहे. केंद्र सरकारने असं उत्तर हे अनेक वेळा दिलं आहे. स्थानिक लोकांनी याबाबत अनेकदा विरोध दर्शवला आहे. अणु ऊर्जा हवी कशाला? विजेची कमतरता आहे का या देशामधे ? सोलर एनर्जीकडे बघा, या देशामध्ये अणु उर्जाच्या मागे का लागलं जात आहे ? संपूर्ण जगाने अणु ऊर्जा नाकारली आहे, भारत मात्र शेपूट पकडून आहे” अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली आहे.






