हिंमत असेल तर भाजपच्या आमदारांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवून दाखवावी,संजय राऊताचं अमित शाहांना ओपन चॅलेंज

मुंबई : राज्यातील भाजप नेत्यांसह केंद्रीय नेतेदेखील महाराष्ट्रातील सत्ता गेल्यामुळे वैफल्यग्रस्त झाले आहेत. हिंमत असेल तर भाजपच्या १०५ आमदारांनी राजीनामे द्यावेत आणि निवडणूक लढवून दाखवावी असे प्रतिआव्हान शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपला दिले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना अन भाजपमध्ये वाद उफाळून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
रविवारी पुण्यात भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शिवसेनेवर आणि महाविकास आघाडीवर टीका केली होती. शिवसेनेने हिंमत असेल, तर पुन्हा निवडणूक घ्यावी असे आव्हान दिले होते. त्यावर संजय राऊत यांनी आज प्रतिआव्हान दिले.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या टीकेला शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
पुढे राऊत म्हणाले की, अमित शहा यांनी केलेले वक्तव्य असत्याला धरून असल्याचे त्यांनी म्हटले. आमच्या सरकारविषयी, शिवसेनेबद्दल, हिंदूत्वाबद्दल प्रश्न उपस्थित करून राज्यातील जनतेला भ्रमित करण्याचा प्रयत्न राज्यातील भाजप नेत्यांकडून मागील दोन वर्षांपासून सुरू आहे. भाजपचे केंद्रीय नेतेदेखील वैफल्यातून त्यांचीच री ओढत असल्याचे राऊत यांनी म्हटले.
शिवसेना सत्ता वाटपाबाबत खोटे बोलत असल्याचे अमित शहा यांनी म्हटले होते. त्या वक्तव्यावरही राऊत यांनी टीका केली. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत शहा याच्या उपस्थितीत ५०-५० टक्के सत्ता वाटप ठरले होते. छत्रपती शिवरायांची पुणे ही भूमी आहे. या ठिकाणी त्यांनी सोन्याचा नांगर फिरवला होता. त्यामुळे पुण्यात तरी शहा यांनी खोटे बोलू नये, असे राऊत यांनी म्हटले.