शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाजवळ सापडली ब्रिटिशकालीन नाणी

मुंबई- सिडकोतील प्रियदर्शनी उद्यानात सुरू असलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या संरक्षण भिंतीसाठी खोदकाम सुरू असताना ब्रिटिशकालीन १६८९ नाणी सापडली. ही नाणी ब्राँझची असून, त्याला सोन्याचा मुलामा देण्यात आला आहे.तहसीलदारांनी पंचनामा करून ही नाणी पोलिसांच्या ताब्यात दिली आहेत.
सिडकोतील प्रियदर्शिनी उद्यानात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य स्मारक व स्मृतिवन उभारण्यात येत आहे. या स्मारकाच्या संरक्षक भिंतीसाठी खोदकाम सूरू होते. जेसीबीच्या साहाय्याने माती काढत असताना एक गाठोडे बाहेर आले. गाठोड्याच्या जीर्ण झालेल्या कपड्यातून काही नाणी बाहेर पडली.
कंत्राटदार रोहित स्वामी यांनी मनपाचे वॉर्ड अधिकारी व्ही. के. गोरे यांना ही माहिती दिली. गोरे यांनी नाण्यांचे वजन केले असता ते जवळपास दोन किलो भरले. त्यानंतर तहसीलदार विजय चव्हाण यांनी नाणी ताब्यात घेऊन त्याचा पंचनामा केला. ही नाणी ब्रिटिशकालीन असल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. नाण्यावर व्हिक्टोरिया राणीचे चित्र आहे.