आमदार नितेश राणेंच्या विरोधात शिवसेनेची मुंबई पोलिसांत तक्रार

मुंबई – राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून राणे कुटुंबीय अर्थात पिता-पुत्र सतत महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना दिसून आले आहेत. अशातच महाविकास आघाडीच्या प्रत्येक निर्णयावर राणे कुटुंबीय टीका करताना दिसून आलेत. त्यातच भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केलेल्या एका ट्विटमुळे शिवसैनिक संतापले आहेत. संतापलेल्या शिवसैनिकांकडून आमदार नितेश राणे यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल भाजपचे आमदार नितेश राणे यांनी चूकीची माहीती ट्विटरद्वारे पसरवल्याचं सांगत काल रात्री मुंबईतल्या वरळी, भोईवाडा, काळाचौकी आणि भायखळा पोलीस स्टेशनमध्ये स्थानिक शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे. एकीकडे राज्य विधिमंडळाचं अधिवेशन सरू असताना पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध राणे असा संघर्ष पाह्यला मिळणार आहे.
आपल्या तक्रारीत शिवसेनेने म्हटले, नितेश राणे यांनी ट्विट करुन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे नाव लिहून शिवसेनेचे नाव बदलणार का? असे लिहिल्यामुळे आम्हा सर्व शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब हे आमचे दैवत असून तीव्र भावना दुखावल्याबद्दल नितेश राणे यांच्यावर तातडीने कारवाई करुन एफआयआर दाखल करण्यात यावा. तसेच त्यांचे ट्विटर अकाऊंट बंद करण्यात यावे अशी मागणी आपल्या तक्रारीत केली आहे.