‘सामना’चा अग्रलेख पुण्याच्या चौकाचौकांत झळकला, वाचा काय आहे प्रकरण ?

मुंबई – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुणे दौऱ्यादरम्यान शिवसेना पक्ष आणि महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली होती. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातून मंत्री अमित शहा यांच्या विधानाचा आणि भारतीय जनता पक्षाचा समाचार घेण्यात आला होता. त्यातच दैनिक ‘सामना’च्या बुधवारच्या अंकात छापून आलेला ‘मस्त आणि महामस्त’ या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेला अग्रलेख पुण्यातील चौकाचौकांमध्ये झळकलाय.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुणे दौऱ्यावर असताना शिवसेनेवर केलेली टीका आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी ‘राष्ट्रपती राजवटी’बाबत केलेल्या विधानाचा खरपूस समाचार या अग्रलेखात घेण्यात आला होता. पुण्यातील शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात या अग्रलेखाचे मोठाले फ्लेक्स पहाटेपासूनच लोकांचे आकर्षण बनले होते. तसेच जागोजागी लावण्यात आलेले हे अग्रलेखाचे बॅनर नागरिक उभे राहून वाचताना दिसून आले.
शिवसेना पुणे उपशहरप्रमुख प्रशांत राणे यांनी हे फ्लेक्स संपूर्ण शहरात झळकवले होते. शिवाजीनगरातील बाजारपेठेत व्यापाऱ्यांनी आणि नागरिकांनी या अग्रलेखाचे स्वागत केले. सदर अग्रलेख पुणेकरांना इतका आवडला की, लोक रस्त्यावर गर्दी करून हा अग्रलेख वाचत होते. ‘मस्त’ अमित शहा आणि राज्यातील त्यांच्या ‘महामस्त’ चेल्यांची ‘सामना’ने चांगलीच खरडपट्टी काढल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत होती.





